पुणे, १९ आॅगस्ट २०२६ : सुस रोड, बाणेरमधील ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी महापालिकेने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रकल्पात आवश्यक उपाययोजना केल्याने शहराच्या घनकचरा व्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रकल्प स्थलांतरित करणे व्यवहार्य नसल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.
सुस रोड-बाणेर विकास मंच तसेच स्थानिक नागरिकांनी प्रकल्पाच्या स्थलांतराची मागणी केली होती. यासंदर्भात अमोल बालवडकर, बाबुराव चांदरे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यावर स्थायी समितीने आयुक्तांचा अभिप्राय मागविला होता.
प्रकल्पाविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. लवादाने २०२० मध्ये प्रकल्प स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर १२ सप्टेंबर २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने लवादाचा आदेश रद्द करून आवश्यक उपाययोजना करून प्रकल्प त्याच ठिकाणी सुरू ठेवण्यास परवानगी दिली.
प्रकल्पात कचरा साठवण जागा बंदिस्त करणे, मिस्टिंग सिस्टिम, स्लरी टाकीसाठी फिल्टर व्यवस्था, ॲक्टिव्हेटेड चारकोल फिल्टर, एपॉक्सी कोटिंग, काँक्रिट पार्किंग बे, रिजेक्टसाठी स्वतंत्र कॉम्पॅक्टर आदी उपाययोजना केल्या आहेत. परिसरात १६१ नवीन झाडे लावली आहेत. पर्यावरणीय तपासणीसाठी निरीची नियुक्तीही केली. सुस रोड प्रकल्पात सध्या दररोज ५५ मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायो-सीएनजी तयार केला जातो. हा प्रकल्प स्थलांतरित केल्यास शहरातील इतर कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर अतिरिक्त भार पडून संकलन व प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकल्प स्थलांतरित करणे योग्य नसल्याचे आयुक्तांनी अभिप्रायात नमूद केले आहे.

More Stories
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून विशेष सत्कार!
शरद पवार गटाने भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात सोडले कमळ
खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला