September 4, 2026

गणेशोत्सवासाठी जुन्याच मंडप परवानग्या ग्राह्य

पुणे, २० आॅगस्ट २०२६ : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडप, स्वागत कमानी आणि रिंगण मंडप उभारण्यासाठी नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता नसून, यापूर्वीच्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेश मंडळांना पुन्हा परवानगी शुल्काचा भुर्दंड बसणार नाही. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत जाहीर आवाहन केले आहे.

पुणे शहरात यंदा १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा होणार आहे. सन २०२२ ते २०२६ या कालावधीतील उत्सव मंडप, स्वागत कमानी व रिंगण मंडपांसाठी २०१९ मध्ये देण्यात आलेल्या परवानग्या ग्राह्य धरल्या जाणार आहेत. मात्र, संबंधित ठिकाणी रस्ते, प्रकल्प किंवा अन्य कारणांमुळे बदल आवश्यक असल्यास नव्याने परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.

मंडप उभारण्यासाठी वाहतूक पोलिस, पोलीस विभाग आणि महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून संबंधित नियमांनुसार कार्यवाही केली जाणार आहे. मंडळांना सर्व आवश्यक परवानग्या एका खिडकी पद्धतीने देण्याची कार्यवाही केली जाईल.

उत्सव काळात ध्वनिप्रदूषणासह नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. उत्सव संपल्यानंतर तीन दिवसांत मंडप, स्टेज, रिंगण मंडप व कमानी हटवणे आणि रस्त्यावरील खड्डे बुजवून जागा पूर्ववत करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

मंडप किंवा कमानीच्या परवानगीच्या जागेबाबत वाद निर्माण झाल्यास उत्सव सुरू होण्यापूर्वी परवानगी रद्द करण्याचा अधिकार महापालिकेकडे राहणार आहे. तसेच मंडळांनी परवानगीची प्रत दर्शनी भागात प्लास्टिक कोटिंगमध्ये लावावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.