October 5, 2024

पुण्यात भाजप करणार अजित पवारांची कोंडी

पुणे, २८ आॅगस्ट २०२४: लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४२ जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीला अवघ्या १८ जागा जिंकता आल्या.  त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या पराभवासाठी अजित पवार जबाबदार असल्याचं म्हटलं होते. अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्याने भाजपला लोकसभेत फटका बसला असा विश्लेषण ऑर्गनायझरमधून करण्यात आला होता. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी भाजपकडून अजित पवार यांना रोखण्याची तयारी सुरु करण्यात आली असल्याची सध्या राजकीय वर्तुळात जोराने होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात रोखण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. यानुसार भाजपने पुण्यातील ग्रामीण मतदारसंघ अजित पवारांसाठी सोडण्याचा आणि स्वतः शहरातील मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली असल्याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. भाजप याच रणनीतीनुसार महायुतीमध्ये जागा वाटप करणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे.

भाजपच्या राज्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचे प्रमुख नेत्यांनी ही रणनीती तयार केली असल्याची चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याने भाजपचा ब्रँड डॅमेज झाला आणि त्यामुळे लोकसभेत भाजपला मोठा फटका बसला अशी टीका लोकसभेच्या निकालानंतर संघाने केली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून अजित पवार यांना रोखण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे असं राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे. त्यामुळे जरी महायुतीचे मोठे नेते महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत असेल तरीही जमिनीवर परिस्थिती वेगळी दिसून येत आहे.

माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील काही विद्यमान आमदारांनी राज्य नेतृत्त्वाकडे अजित पवार यांना रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या राज्य नेतृत्त्वानं गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत नेत्यांना आणि आमदारांना संभाव्य जागावाटपाची कल्पना दिली आहे.

अजित पवार गटाला पुण्यातील ग्रामीण भागात अधिकाधिक जागा देण्याचा आणि स्वतः शहरातील जगांवर निवडणूक लढवण्याचा पक्षाकडून विचार करण्यात येत आहे असं पुण्यातील नेत्यांना सांगण्यात आलं असल्याची माहिती भाजपच्या या वरिष्ठ नेत्यानं एका वृत्तपत्राला दिली. जर असं झालं तर अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरले.