October 5, 2024

महाविद्यालयांनी १०० टक्के विद्यार्थी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, 05 सप्टेंबर 2024: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढणे गरजेचे असून त्यासाठी सर्व महाविद्यालयांनी पात्र १०० टक्के विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीप व्यवस्थापन कक्षाच्यावतीने महाविद्यालयाचे समन्वय अधिकारी व सदिच्छादूत यांच्याकरीता आयोजित प्रशिक्षणसत्राच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप समन्वयक अर्चना तांबे, खडकवासला मतदारसंघाचे स्वीप समन्वयक शरद गव्हाळे आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यात १८ ते २९ वर्षे वयोगटातील नव मतदारांच्या नोंदणीत वाढ झाली आहे. तथापि, अद्यापही महाविद्यालयातील मतदार यादीत नाव नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाविद्यालयांनी मतदार जनजागृतीकरीता विविध उपक्रमाचे आयोजन करावे. याकरीता समन्वयक अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि समन्वय ठेवणे आवश्यक आहे.

भारतीय लोकशाही प्रक्रियेत महाविद्यालयीन युवकांची मोठी जबाबदारी आहे. युवकांची मतदार नोंदणीतील उदासीनता दूर करुन त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याकरीता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी मतदार नोंदणी, मतदार जनजागृती विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन महाविद्यालयांनी उत्तम काम केले आहे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले ‘मराठा लष्करी भूप्रदेश’अंतर्गत जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड, राजगड या किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे. नामांकनादरम्यान या किल्ल्यांचा प्रचार-प्रसारासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना, सूचना पुरातत्व विभागाच्या adppune७७@gmail.com या ई-मेल पत्त्यावर कळवाव्यात, असे आवाहनही डॉ. दिवसे यांनी यावेळी केले.

श्रीमती कळसकर म्हणाल्या, पुणे हे विद्येचे माहेरघर असून येथे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणाकरीता येतात. या विद्यार्थ्यांची मतदार यादीत नाव नोंदणी करुन त्यांना मतदान प्रकियेत सहभागी करून घ्यावे. निवडणुकीच्यावेळी मतदारांना मतदान केंद्राविषयी माहिती देण्यात यावी. ज्येष्ठ नागरिक, महिलांना अशा घटकांना मतदानाच्यावेळी मदत करावी, असेही श्रीमती कळसकर म्हणाल्या.

श्रीमती तांबे म्हणाल्या, आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदार संघनिहाय मतदार जनजागृती करण्यात येणार असून याकरिता महाविद्यालयाचा सहभाग महत्त्वाचा आहे. समन्वय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय मतदार जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करावेत. निवडणूक विषयक वातावरण निर्मिती करावी. याकरीता भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ किंवा व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करावा. सर्वाधिक मतदार जनजागृतीपर उपक्रम आयोजित करणाऱ्या तीन महाविद्यालयांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने गौरविण्यात येणार आहे, असेही श्रीमती तांबे म्हणाल्या.

श्री. गव्हाळे यांनी मतदार जागृतीसाठी सदिच्छादूताने मतदार जागृती तसेच त्याकरिता आयोजित उपक्रम, मतदार नोंदणीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
यावेळी अर्चना तांबे यांनी निवडणूक आयोगाची विविध उपयोजके (ॲप) व त्यांच्या वापराबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. निवडणूक आयोगाच्यावतीने मतदारांकरिता मतदान केंद्रांवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली.

यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमास २०० हून अधिक महाविद्यालयांचे समन्वयक अधिकारी, सदिच्छादूत उपस्थित होते.