पुणे, 05 सप्टेंबर 2024: गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे नोंदणी करावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या आहेत.
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमण २०११ अंतर्गत गणेश मंडळानी काळजी घ्यावी. भाविकासाठी तयार केलेला प्रसाद हा काचेच्या झाकणात किंवा पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा. जेणेकरून प्रसादाला धूळ, माती, माशा, मुंग्या या व इतर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. भाविकांना शिळे अन्नपदार्थ सेवनास देऊ नयेत. प्रसाद हाताळणाऱ्या सर्व व्यक्तींचे कपडे स्वच्छ असावेत, त्यांनी साबणाने हात स्वच्छ धुवूनच कामास सुरुवात करावी. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीने प्रसाद बनविणे व हाताळण्याची कामे करू नयेत.
प्रसाद हाताळणाच्या व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छतेच्या सर्व नियमांची काळजी पूर्वक अंमलबजावणी करावी. नाक, कान, डोके, केस खाजवणे वा डोळे चोळणे, शिंगणे, थुंकणे, नाक शिंकरणे, तंबाखु वा धुम्रपान करणे टाळावे. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीची नखे व्यवस्थीत कापलेली असावीत व त्यात घाण साचलेली असू नये. हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडा वापरावा. प्रसाद तयार करणाऱ्या व्यक्तीने हात मोजे व अॅप्रन घालावा तसेच केस संपूर्णपणे झाकणारी टोपी व तोंडाला मास्क घालावा.
प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन १०० रुपये शुल्क भरून अन्न व औषध प्रशासन यांचेकडे नोंद करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. कच्च्या अन्न पदार्थाची खरेदी बिले बाळगावीत व कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक दुकानातून खरेदी करावीत, असेही अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) सु. ग. अन्नपुरे यांनी कळविले आहे.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान