July 8, 2025

धानोरी-चऱ्होली डी.पी. रस्त्यास वनविभागाची मंजुरी; आमदार बापूसाहेब पठारे यांच्या प्रयत्नांना यश

पुणे, १६ जून २०२५ : वडगावशेरी मतदारसंघातील धानोरी ते चऱ्होली दरम्यानच्या नियोजित विकास आराखडा (डी.पी.) रस्त्यास अखेर वनविभागाची बहुप्रतिक्षित मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला आता अधिक गती मिळणार असून, अनेक वर्षांपासून रखडलेला हा मार्ग प्रत्यक्षात आकारास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मंजुरीमागे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा मोठा वाटा आहे.

धानोरी ते चऱ्होली या दोन गावांना जोडणाऱ्या या डी.पी. रस्त्यासाठी ३०० मीटर लांबीची व २४ मीटर रुंदीची, म्हणजेच एकूण ०.७३९२ हेक्टर इतकी जागा वनविभागाच्या अखत्यारीत होती. या रस्त्याचा काही भाग धानोरी सर्वे नंबर ५ ते चऱ्होली हद्दीतून जात असल्याने वनविभागाच्या परवानगीशिवाय प्रत्यक्ष कामाला सुरुवात करता येत नव्हती.

आमदार पठारे यांनी या अडथळ्याबाबत वेळोवेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली होती आणि अधिकृत निवेदन सादर करून परवानगीसाठी आग्रह धरला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळून वनविभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

शहरांमध्ये सुलभ संपर्क
या मंजुरीमुळे धानोरी, चऱ्होली, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, येरवडा, लोहगाव, कळस आदी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रस्त्यामुळे पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होणार असून, वाहतूक कोंडी कमी होणार आहे. वेळ आणि इंधनाची बचत होईल, तसेच नागरी आणि औद्योगिक विकासालाही गती मिळणार आहे.

सध्या पर्यायी रस्त्याचा अभाव असल्याने नागरिकांना विशेषतः पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मंजुरी मिळाल्यामुळे आता पुणे महापालिकेला रस्त्याचे काम कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करता येणार आहे.

“हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नागरिकांच्या सततच्या तक्रारी लक्षात घेऊन मी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. आमदार महेश लांडगे यांनीही त्यांच्या भागासाठी विशेष प्रयत्न केले,” अशी भावना पठारे यांनी व्यक्त केली.