पुणे, 16/06/2025: सिंहगड रस्त्यावर उभारलेल्या उड्डाणपुलाला ‘प्रतिपंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी उड्डाणपूल’ नाव देण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली. कांबळे यांनी सोमवारी (ता. १६) पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना या मागणीचे निवेदन दिले. प्रसंगी माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नितीन हनमघर, शरद दबडे, विकास कांबळे, सागर गायकवाड, संघदीप शेलार आदी उपस्थित होते.
शशिकांत कांबळे म्हणाले, “सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाईम थिएटरपर्यंत उभारलेल्या उड्डाणपुलामुळे वडगाव धायरी, आनंदनगर, नांदेड सिटी, नऱ्हे-आंबेगाव, किरकटवाडी, सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. याबद्दल राज्य शासन, पुणे महानगरपालिका व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथे प्राचीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर असून, या धार्मिक स्थळाला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. एकादशीच्या व आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भाविक येथे येत असतात. हा उड्डाणपूल याच भागातून जात असल्याने या पुलाला ‘प्रतिपंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी उड्डाणपूल’ असे नाव द्यावे, अशी आमची मागणी आहे.”
तसेच या उड्डाणपुलावरून सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. अवजड वाहनांमुळे शहरात अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. निष्पाप लोकांचा जीव जात आहे. अवजड वाहनांच्या सर्रास वाहतुकीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. पुलाला हादरे बसत असून, पुलावरील वाहतूक एकेरी असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन उड्डाणपुलावरून कंटेनर, ट्रेलर, सिमेंट मिक्सर, डंपर, मल्टीएक्सल वाहनांना बंदी घालावी, असेही शशिकांत कांबळे म्हणाले.
More Stories
पुणे मेट्रोच्या ताफ्यात लवकरच नवीन १२ मेट्रो ट्रेन सेट
पुणे: जवानाच्या वेळीच धाव घेतल्याने टळली दुर्घटना; खिडकीत अडकलेल्या चार वर्षाच्या मुलीचे वाचवले प्राण
Pune: डिजे लावणार्या गणेश मंडळांना मदत नाही, डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार