November 7, 2024

५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर

पुणे, दि. 10 ऑक्टोबर, २०२४: कातकरी आदिवासींकडे आजही बऱ्याच प्रमाणात जात प्रमाणपत्र, आधार कार्ड यासारखे ओळख सांगणारे किंवा दाखवणारे सरकारी दस्तावेज नसल्याने विविध सरकारी योजनांचा लाभ त्यांना घेता येत नाही. ओळख अधोरेखित करणारी ही प्रमाणपत्रे उपलब्ध व्हावी या उद्देशाने गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या जनजाती कल्याण आश्रम आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सुहास लुंकड यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुळशी तालुक्यातील माले गावात असलेल्या हुतात्मा नाग्या महादू कातकरी समाज विकास केंद्र येथे तालुक्यातील तब्बल ५५० कातकरी आदिवासींना नुकतेच जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यामुळे या भागातील आदिवासी कातकरी समाजातील व्यक्तींना सरकारी ओळख मिळून त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. या उपक्रमासाठी मुळशी तालुक्यातील प्रांत अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालय यांचे सहकार्य मिळाले.

मुळशी विभागाचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्य अधिकारी वामन गेंगजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत कार्यवाह डॉ प्रवीण दबडघाव, रोहन बिल्डर्सचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक सुहास लुंकड, जनजाती कल्याण आश्रमाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष प्रकाश धोका, मुळशी विभाग अध्यक्ष वसंत वाघमारे, रोहन बिल्डर्सच्या सीएसआर विभागाच्या प्रमुख वर्तिका भटेवरा, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार मुळशी रणजीत भोसले, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी घोडेगाव प्रदीप देसाई यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी बोलताना डॉ प्रवीण दबडघाव म्हणाले, “आदिवासी कातकरी समाज हा कायमच देशभक्त समाज राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात या समाजाने योगदान दिले आहे. पुढे हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनीही ही परंपरा चालवली. मधल्या काळात हा समाज मुख्य प्रवाहापासून बाजूला गेला होता, आज पुन्हा समाजाला मुख्य प्रवाहात येण्याची गरज असून यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. आज या समाजातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण हे मुलांपेक्षा जास्त आहे. या समाजातील मुला मुलींनी शिक्षण घेवून आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणावे यासाठी जनजाती कल्याण आश्रम प्रयत्नशील असून या कार्यात लाभलेली रोहन बिल्डर्सची साथ मोलाची आहे.”

सुहास लुंकड म्हणाले की, यापूर्वी आम्ही कातकरी समाजातील ८०० व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यात योगदान दिले आहे. याशिवाय आम्ही या समाजाला घर, दस्तऐवजीकरण, आरोग्य, शिक्षण आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांमध्ये देखील मदत करत आहोत. या सर्व क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे केलेले प्रयत्न कातकरी समाजाच्या एकंदर प्रगतीसाठी आणि त्यांच्या जीवनमान उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरतील असा आम्हाला विश्वास आहे. शिवाय या नागरिकांसाठी सरकारी योजनांमधून गृहबांधणी प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे.” यामध्ये आम्ही ५५ घरांची निर्मिती करीत असून प्रत्येक घरासाठी सरकारी योजनेतून १ लाख २० हजार रुपयांची मदत मिळाली आहे. उर्वरित रक्कमेचे योगदान रोहन बिल्डर्सच्या वतीने दिले जात आहे. अशा प्रकारे ३५ घरांचे काम पूर्ण झाले आहे, आणि येत्या २-३ महिन्यांत उर्वरित २० घरांचे कामही पूर्ण होईल, अशी माहिती लुंकड यांनी दिली.

प्रशासकीय कामांमध्ये सातत्याने पाठपुरावा करणे खूप महत्त्वाचे असते, परंतु जनजाती कल्याण आश्रम व रोहन बिल्डर्स यांनी वेळोवेळी हा पाठपुरावा करून कातकरी समाजातील नागरिकांची ही जात प्रमाणपत्रे बनवण्याचे मोलाचे काम केले आहे. या समाजातील नागरिकांना आता जात प्रमाणपत्रे उपलब्ध झाल्याने त्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ घेणे शक्य होईल, असे सुधीर भागवत यांनी नमूद केले. सागर काटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, ऋषभ मुथा यांनी आभार मानले, तर मयूर कर्जतकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.