April 27, 2025

होळी : रंग उत्सवाचे…

राजेश घोडके
पुणे, १३/०३/२०२५: होळी हा भारतात साजरा केला जाणारा एक अत्यंत आनंददायी आणि उत्साहपूर्ण सण आहे. हा सण जीवनातील एक नवीन अध्याय, नवा उत्साह, आणि प्रेमाचा प्रतीक बनतो. होळीला विविध पद्धतीने साजरा केलं जातं. विशेषतः महाराष्ट्रात होळी साजरी करण्याची काही अनोखी परंपरा आहे. येथे रंग उधळण्याचे उत्सव, पारंपारिक संगीत, खास खाद्यपदार्थ आणि सामाजिक ऐक्य यांचं महत्त्व आहे. .

होळी चा दिवस

होळी हा सण फाल्गुन या मराठी महिन्यात दोन दिवस साजरा केला जातो. होळी वसंत ऋतूच्या आगमनाशी संबंधित असते. या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी, शिमगा,दोलायात्रा ,काम दहन अशी वेगवेगळी नावं आहेत .

होलिका दहन (पहिला दिवस): या दिवशी होलिका दहन केले जाते. यात होलिकेच्या प्रतिकात्मक होळीचा अग्नी प्रज्वलित करून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.
धूलिवंदन (दुसरा दिवस): या दिवशी लोक एकमेकांना रंग अथवा अगोदरच्या दिवशी च्या दहन केलेल्या होलिकेची राख लावून धूलिवंदन साजरी करतात. होळी साजरी करण्याची पद्धत भारतातील इतर भागांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील रंगांनी भरलेली, आनंदाने फुललेली आणि परंपरेने समृद्ध आहे. महाराष्ट्रात होळी कशी साजरी केली जाते, हे पाहण्यासारखं आहे.

होलिका दहन

होळीच्या उत्सवाची सुरूवात होलिका दहनाने होते. होलिका आणि प्रह्लादाच्या पौराणिक कथेच्या संदर्भात, होलिका दहन करणे ही एक महत्त्वाची परंपरा आहे. होलिका जाळल्यामुळे वाईटावर चांगल्याचे विजय दर्शवला जातो. गावाच्या चौकात किंवा सार्वजनिक ठिकाणी होलिका तयार केली जाते, ज्यात बांबू, कागद, एरंडाचे झाड, नारळाच्या झाडाच्या फांद्या, शेणाच्या गोवऱ्या वापरले जातात. होलिका जाळल्यावर लोक एकत्र येऊन पूजा करतात आणि मंत्र म्हणतात. नाच, गाणी, आणि लोकगीत हे होलिका दहनाच्या ठिकाणी ऐकू येतात.

रंग बरसे…

होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगाने, राखेने होळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात हा दिवस अत्यंत धूमधामाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. लोक एकमेकांवर रंग उधळून, पाणी रंगाने भरलेल्या बॅलून, गुलाल, आणि रंगीबेरंगी पाणी फेकतात.

लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण रंगांच्या खेळात सामील होतात. रंग उधळताना, डीजेवर गाणी, नृत्य, आणि खास रंग यांचं एक मिश्रण साजरं होतं. लोक नवा उत्साह, नवा जीवन, आणि निसर्गाच्या रंगांची उधळण व्यक्त करत आनंदात बुडून जातात. मुंबई, पुणे या शहरांमध्ये रंग धुलीवंदनाच्या दिवशी खेळले जातात. परंतु महाराष्ट्राच्या काही भागात हा पारंपरिक खेळ होळीच्या ५ दिवसांनंतर म्हणजेच रंग पंचमीच्या दिवशी सुद्धा खेळला जातो.

पौराणिक कथा.

होळी सणाचा मूळ आधार होलिका आणि प्रह्लादाच्या कथेवर आहे. या कथेत, हिरण्यकश्यप नावाचा राजा होता. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची इर्षा करायचा तसेच याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव देखील ऐकणे पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता आणि हे हिरण्यकश्यप ला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला मारण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून आपला पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्याला न घाबरता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. या सगळ्याला कंटाळून राजाने एकदा एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जीला वरदान मिळाले होते की आगीवर ती विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही.

राजाने होलीकेला भक्त प्रल्हाद ला घेऊन पेटत्या अग्नीत बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या तिच्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूचा नामस्मरण राहिला. थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली की ज्यानुसार होलीकेला आठवलं की तिला वरदानच असे सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल भक्त प्रल्हाद ला अग्नी काही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नी त जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहण म्हणून ओळखू लागले.त्यामुळे होळी सणाच्या दिवशी वाईटावर चांगल्याचं विजय, सत्याचं असत्यावर आणि धर्माचं अधर्मावर वर्चस्व साजरा केला जातो.

ऋतू परिवर्तन

होळी सण हे वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे. हे सण हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या प्रारंभापर्यंत साजरा केला जातो. निसर्ग आपले रंग उधळून फुलतो, आणि जीवनाला एक नवा स्पर्श देतो. होळी ह्या ऋतू परिवर्तनाचा आनंद व्यक्त करणारा एक उत्सव आहे.

होळीला विशेष खाद्यपदार्थ

होळी सणाच्या दिवशी पारंपारिक गोड पदार्थ बनवले जातात, ज्यांचा आनंद घेणे महत्त्वाचे मानले जाते. पुरणपोळी, गुजिया, थंडाई, हे खाद्यपदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत.
पुरणपोळी: होळीच्या दिवशी खास बनवलेली एक गोड पोळी जी गुळ आणि कणकेच्या मिश्रणाची असते.

गुजिया: जो खोबरं, साखर, आणि ड्रायफ्रूट्स भरलेला असतो.
थंडाई: मसालेदार दूध शरबत, जे खास करून महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. काही ठिकाणी थंडाईमध्ये भांग देखील घालून आनंद घेतला जातो.
होळी सण भारतभर साजरा केला जातो, परंतु त्याचे विविध ठिकाणी विशेष प्रकार आहेत. महाराष्ट्रात रंग उधळून साजरी केली जात असली, तरी उत्तर भारतात, विशेषतः वृंदावन आणि बांकी बिहारी मंदिरात, होळीचे महत्त्वाचे उत्सव साजरे केले जातात.