पुणे, दि. १२: देशभरात १३ ते १५ ऑगस्टया कालावधीत दरवर्षीप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) उपक्रम राबविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले असून त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय इमारती तसेच पुणे विभागातील नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम गत दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमानुसार प्रत्येक देशवासीयांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन आपला देशाभिमान व्यक्त करण्यासह स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करावे, असे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.
हा उपक्रम राबवित असताना प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयाने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान सूर्योदयानंतर राष्ट्रध्वज फडकावणे आणि सूर्यास्तापूर्वी उतरवणे बंधनकारक आहे. नागरिकांनी आपल्या घरी लावलेला राष्ट्रध्वज या संपूर्ण कालावधीत संध्याकाळी उतरवणे आवश्यक नाही.
राष्ट्रध्वज संहितेचे पालन करुन या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा. तिरंगा सेल्फीज हा उपक्रम राबवून सदर छायाचित्रे शासनाच्या https://harghartiranga.com संकेतस्थळावर अपलोड करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- सर्व नागरिकांनी ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात सहभागी व्हावे. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी ते राहत असलेल्या शासकीय निवासस्थानी किंवा स्वत:च्या घरी १३ ते १५ ऑगस्टदरम्यान तिरंगा फडकवावा. घरी फडकविलेल्या राष्ट्रध्वजासोबत सेल्फी घेऊन कार्यालयप्रमुखांकडे पाठवावे.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन