December 14, 2024

राज्यात काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर तर काही ठिकाणी १ नोव्हेंबर रोजी साजरे करता येणार लक्ष्मीपूजन

पुणे, दि. ३१ ऑक्टोबर २०२४ : दिवाळीतील लक्ष्मीपूजन कधी करावे, याविषयी अनेक पंचांगकर्त्यांमधेच संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक पंचांग व कॅलेंडरमध्ये धर्मशास्त्रातील वचनांचा, चुकीचा अर्थ काढून फक्त १ नोव्हेंबर या एकाच दिवशी लक्ष्मीपूजन असल्याची नोंद दिलेले आहे. मात्र राज्यातील काही भागात ३१ ऑक्टोबर रोजी तर काही भागात १ नोव्हेंबर रोजी नागरीकांनी लक्ष्मीपूजन करावे असे आवाहन सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाचे गौरव देशपांडे यांनी केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना गौरव देशपांडे म्हणाले, “सर्व प्रमुख पंचांगांमध्ये यावर्षी लक्ष्मीपूजन हे १ नोव्हेंबर या एकाच दिवशी असल्याची नोंद देण्यात आली असल्याने या संदर्भात संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पंचांगात व कॅलेंडरमध्ये धर्मशास्त्रातील वचनांचा, चुकीचा अर्थ काढून फक्त १ नोव्हेंबर या एकाच दिवशी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. मात्र धर्मशास्त्रात सांगितलेल्या वचनाचा नीट अर्थ लावला तर यावर्षी ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर अशा दोन्ही दिवशी लक्ष्मीपूजन करता येणार आहे.”

देशपांडे पुढे म्हणाले, निर्णयसिंधूत ‘दण्डैकरजनीयोगे दर्शः स्यात्तु परेऽहनि । तदा विहाय पूर्वेद्युः परेऽन्हि सुखरात्रिका ।।’ अर्थात जेव्हा दोन दिवस अमावास्या प्रदोषकाळात विद्यमान असेल तेव्हा सूर्यास्तानंतर १ दंड म्हणजे १ घटिका अर्थात् २४ मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त अमावास्या असल्यास त्याच दिवशी म्हणजे १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे आणि सूर्यास्तानंतर २४ मिनिटांपेक्षा कमी अमावास्या असल्यास आदल्या दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावे असे दिले आहे. त्यानुसार राज्यातील काही भागात ३१ ऑक्टोबर तर काही भागात १ नोव्हेंबर अशा दोन्ही दिवशी लक्ष्मीपूजन करता येणार आहे.

काशीतील पूज्यपाद पं. श्री गणेश्वरशास्त्री द्रविड गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ३१ ऑक्टोबर रोजी अहमदनगर, औरंगाबाद, अहमदाबाद, वडोदरा, बेंगलोर, बीड, बेळगाव, धुळे, पुणे, गोकर्ण, हुबळी, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, सोलापूर, पणजी, रत्नागिरी, सांगली, सातारा, उस्मानाबाद, विजापूर, धारवाड या भागात तर १ नोव्हेंबर या तारखेस अकोला, अमरावती, बिदर, बुलढाणा, भंडारा, भोपाळ, चंद्रपूर, गुलबर्गा, ग्वाल्हेर, हैदराबाद, लातुर, नागपूर, नांदेड, निझामाबाद, परभणी, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी नागरीकांनी लक्ष्मीपूजन करावे.

भारताबाहेरचा विचार केल्यास ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण अमेरिका, लंडन, पॅरिस, रोम, वॉरसॉ, बर्लिन सोबतच पूर्ण युरोप खंड, दुबई, अबूधाबी, शारजा, सौदी अरेबिया आणि आफ्रिका या ठिकाणी लक्ष्मीपूजन करता येईल तर सिंगापूर, मलेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान येथील भारतीय नागरिकांनी १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे असेही देशपांडे यांनी सांगितले.