गायत्री क्षीरसागर | विज्ञान संवादक
पुणे, 24/10/2026: “अन्नदाता सुखी भव!” जेवणानंतर माझे वडील नेहमी म्हणायचे. लहानपणी सहज ऐकलेले हे शब्द आज अधिक अर्थपूर्ण वाटतात. आपल्या ताटातील अन्नामागे शेतकऱ्याचे कष्ट, माती, पाणी, सूर्यप्रकाश आणि निसर्गाचे योगदान असते. आपल्या परंपरांमध्येही अशाच अनेक गोष्टी सहजपणे गुंफलेल्या आहेत. गरज आहे ती त्यांचा अर्थ समजून घेण्याची आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची.
नुकतीच नवरात्रीच्या काळात गुजरातला जाण्याची संधी मिळाली. सोसायट्यांपासून भव्य मंडपांपर्यंत रंगणारा गरबा, त्याचा उत्साह आणि सर्व वयोगटांतील लोकांचा सहभाग पाहून आनंद वाटला. पुण्यासारख्या शहरातही गरबा शिकण्यासाठी अनेक जण वेळ आणि पैसे खर्च करतात. भव्य आयोजन केले जाते आणि या उत्सवाचा मनापासून आनंद घेतला जातो. हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
पण हे सर्व पाहताना मनात एक प्रश्न आला आपल्या महाराष्ट्रातील भोंडला किंवा हादग्यासाठी आपण असाच उत्साह दाखवतो का? आपल्या समृद्ध लोकपरंपरांना आपण पुरेसे महत्त्व देतो का?
हा प्रश्न गरबा आणि भोंडला यांची तुलना करण्यासाठी नाही. इतर संस्कृतींचा आनंद घेताना आपल्या परंपरांमधील सौंदर्यही नव्याने शोधण्याची ही संधी आहे.
भोंडला किंवा हादगा हा महाराष्ट्रातील पारंपरिक लोकउत्सव आहे. नवरात्रीच्या काळात, विशेषतः हस्त नक्षत्राच्या आसपास, हत्तीच्या प्रतिमेभोवती फेर धरून महिला आणि मुली पारंपरिक गाणी म्हणतात
पावसाळ्यानंतरची समृद्धी, शेती आणि निसर्गाविषयीची कृतज्ञता यांच्याशी या परंपरेचे नाते जोडलेले आहे. गाणी, खेळ आणि खिरापतीच्या माध्यमातून स्त्रियांना एकत्र येण्याची, आनंद व्यक्त करण्याची आणि लोकपरंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते.
भोंडला म्हणजे केवळ गाण्यांचा फेर नव्हे, तर निसर्ग, स्त्रीजीवन आणि सामूहिक आनंद यांची सांगड घालणारी आपली समृद्ध लोकपरंपरा!

अगदी परवाच आमच्या सोसायटीत भोंडला साजरा करताना हा विचार अधिक प्रकर्षाने जाणवला. महिला, मुली आणि मुले एकत्र आले, यूट्यूब वर का होईना पण सर्वांनी त्या सोबत टाळ्यांचा ताल धरला. या आनंदासोबत एक गोष्ट मात्र जाणवली, भोंडल्याची इतकी सुंदर गाणी हळूहळू विस्मरणात जात आहेत. याच अनुभवातील माझ्यासाठी सर्वांत सुंदर क्षण म्हणजे माझ्या आईने माझ्या मुलीला शिकवलेले श्रीकांता कमलकांता” हे भोंडल्यातील अतिशय लोकप्रिय गाणे. पतीच्या स्वभावाचे मिश्किल आणि खट्याळ वर्णन करणाऱ्या या गाण्यातून जुन्या लोकगीतांमधील विनोदबुद्धी आणि मानवी स्वभावाचे बारकाईने केलेले निरीक्षण जाणवते.
माझ्या आईकडून माझ्या मुलीपर्यंत हे गाणे पोहचले आणि तेही पुस्तकाची गरज न पडता, केवळ गाण्यातून!
त्या क्षणी जाणवले की हा केवळ गाण्याचा खेळ नव्हता; आपण भाषेचा, आठवणींचा आणि संस्कृतीचा वारसा पुढे देत होतो. अशी गाणी विसरली, तर त्यांच्यासोबत त्यांतील विनोद, बोलीभाषा, जीवनदृष्टी आणि अनेक पिढ्यांचे अनुभवही हरवू शकतात.
भोंडल्याची ही गाणी ऐकताना एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे किती सुंदर पद्धतीने आपल्या पूर्वजांनी
स्त्रियांच्या भावविश्वाची, अनुभवांची आणि सामाजिक जीवनाची मौखिक नोंद करून ठेवली आहे.
“ऐलमा पैलमा गणेश देवा”, “एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबं झेलू”, “कारल्याचा वेल लाव गं सुने” आणि “नणंदा भावजया दोघी जणी” यांसारख्या गीतांतून मानवी स्वभाव, कौटुंबिक नाती, दैनंदिन जीवन आणि खाद्यसंस्कृतीचे सुंदर चित्रण त्यात टिपले आहे काही गाणी खट्याळ आणि विनोदी, काही नात्यांवर भाष्य करणारी, तर काही शेती, वनस्पती, प्राणी आणि निसर्गातील घटकांशी जोडलेली आहेत.
या गीतांचे वैशिष्ट्य म्हणजे साध्या, ओघवत्या भाषेतून जीवनातील बारकावे टिपण्याची त्यांची ताकद. त्यांत उपदेशापेक्षा अनुभव, कृत्रिमपणापेक्षा सहजता आणि दैनंदिन जगण्याचे सूक्ष्म निरीक्षण अधिक दिसते.

या गाण्यांच्या माध्यमातून स्त्रियांना एकत्र येण्याची, हसण्याची, स्वतःला व्यक्त करण्याची आणि आपल्या अनुभवांना सामूहिक स्वर देण्याची संधी मिळते. त्यामुळे भोंडला हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून स्त्रियांनी जपलेला सांस्कृतिक अवकाश आणि मराठी भाषेचा अनमोल मौखिक ठेवा आहे.
या लोकगीतांमधून एक मात्र नक्की की “निसर्ग” केवळ पार्श्वभूमीवर नाही तर तो मानवी जगण्याचा अविभाज्य भाग आहे. वनस्पती, प्राणी, ऋतू, शेती आणि खाद्यपदार्थ यांचे संदर्भ माणसाचे जीवन सभोवतालच्या सजीव सृष्टीशी किती घट्ट जोडलेले आहे, हे देखील ह्यातून किती सहजपणे उलगडले आहे.
मी आज एक विज्ञान संवादक म्हणून ह्या सर्व गोष्टी पाहताना मला या परंपरांतून मुलांना शिकण्याच्या अनेक संधी दिसतात. गाण्यातील एखाद्या वनस्पतीची ओळख करून घेणे, प्राण्यांविषयी चर्चा करणे किंवा ऋतू आणि शेतीचे संदर्भ शोधणे अशा छोट्या प्रश्नांतून भाषा, विज्ञान आणि पर्यावरण यांचा सुंदर संवाद सुरू होऊ शकतो.
आपल्या इतर सणांतही असे अनेक धागे आहेत. बैलपोळ्यातील कृतज्ञता, घटस्थापनेतील अंकुर, गणपतीच्या मातीच्या मूर्ती आणि दिवाळीच्या किल्ल्यांतून उलगडणारा महाराष्ट्राचा इतिहास प्रत्येक सणात शिकण्यासारखे काही ना काही आहे. हे सर्व जपण्यासाठी , आपल्याला कोणत्याही भव्य आयोजनाची गरज नाही. पण आजी-आईंकडून गाणी शिकणे, त्यांचे अर्थ समजून घेणे आणि त्यांची नोंद ठेवणे, मात्र गरजेचे वाटतें.
ह्या सणांतून मुलांना केवळ परंपरा शिकवण्यापलीकडे जाऊन, त्यांमागची माणसे, नाती, निसर्ग आणि जीवनदृष्टीही समजावून सांगूया. आपल्या समृद्ध सण-उत्सवांचा वारसा पुढील पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचवूया. कारण हे छोटे-मोठे सण, त्यांमागील इतिहास, लोकसहभाग, भाषा, परंपरा, संस्कृती आणि कलाविष्कार हे केवळ आपल्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक नाहीत, तर मानवसमाजाला निसर्गाशी जोडणारा, माणसा-माणसांतील नाती दृढ करणारा आणि पिढ्यांना एकत्र गुंफणारा जिवंत सांस्कृतिक धागा आहे. हा धागा जपूया, समृद्ध करूया आणि पुढील पिढीच्या हाती सोपवूया!

More Stories
दसऱ्याच्या मुहूर्तावर महारेराकडून ४३५ नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी; २३,७१९ कोटींची गुंतवणूक अपेक्षित
पुणेकर कलारसिकांना होणार देशभरातील हस्तकला व संस्कृतीचे होणार दर्शन
नवीन पुनर्विकास शासन निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता येणार – सुहास पटवर्धन