August 8, 2026

पथ विभागाचा कारभार ढिसाळच , रस्त्यांवर एवढे खड्डे पडले कसे ?

पुणे, ४ आॅगस्ट २०२६ : पुणे शहरातील रस्त्यांची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण केली आहे. खड्डे बुजविण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांची आयुक्त नवल किशोर राम यांनी खरडपट्टी काढली.पथ विभागाचा कारभार ढिसाळ आहे. रस्त्यांवर एवढे खड्डे कसे पडले असा सवाल करतानाच रस्ते खोदाई केल्यानंतर ते पूर्ववत करण्यासाठी काढलेल्या ७५ कोटी निविदांना मंजुरी तातडीने द्यावी. शहरातील खड्डे येत्या महिनभरात पूर्णपणे बुजवावेत असे आदेशही आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत वाहिन्यांसह विविध कामांसाठी ऐन पावसाळ्यात ठिकठिकाणी खोदाईची कामे सुरू होती. तर, खोदाई करण्यात आलेले रस्ते, पदपथ व्यवस्थित दुरुस्त करण्यात आले नाहीत. परिणामी शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. संबंधित खड्ड्यांमुळे शहरातील वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला असल्याची सद्यःस्थिती आहे. दुचाकीस्वारांना वाहने चालविताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. महापालिकेकडून रस्त्यावरील खड्डे बुजविले जात आहेत पण ही खड्डे दुरुस्ती तात्पुरती मलमपट्टी ठरत आहे. खड्डा बुजवला त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडत आहेत. त्यामुळे पालिकेवर टीकेची झोड उठत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रस्त्यांवर खड्डे पडल्याने आयुक्त नवलकिशोर राम यांनी पथ विभागाची झाडाझडती घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत होते.

शहरात विविध विकासकामे , कंपन्यांकडून खोदकाम झाल्याने खड्डे वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र ‘पथ विभागाचा कारभार ढिसाळ आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खोदकामानंतर पुनर्डांबरीकरण नीट झाले नसल्याने हे खड्डे पडले आहेत. तसेच विविध विभागांमध्ये समन्वय नसल्यानेही ही कामे नीट झाली नसल्याची कबुली आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

यंदा विविध कंपन्यांना, तसेच पालिकेच्या विभागांना खोदकामाची परवानगी देण्यात आली होती. इंधनटंचाईच्या काळात एमएनजीएलला थेट खोदकामाची परवानगी देण्यात आली होती. या खोदकामांनंतर रस्त्यावरील खड्डे नीट बुजवून समपातळीत आणलेले नाहीत. त्यातच अनेक रस्त्यांवर पावसाळी गटारे नसल्याने पावसात साचलेले पाणी रस्त्यात मुरून रस्ते खचले आहेत,’असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

पालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय नाही

क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या हद्दीतील खड्डे बुजविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली जात नसल्याचे दिसून आले आहे. काही क्षेत्रीय कार्यालयात खड्डे दुरुस्तीच्या कामाच्या निविदाही मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय नाही. पाणी, ड्रेनेज विभागानेही चुकीची कामे केली आहेत असे सांगतानाच रस्त्यांवर एवढे खड्डे कसे पडले असा सवाल आयुक्त नवल किशोर राम यांनी केला.

८००० चौरस मीटर क्षेत्रफळातील खड्डे बुजविले
गेल्या काही दिवसात कोल्डमिक्स, हॉटमिक्स तसेच अन्य तंत्रज्ञान वापरून आठ हजार चौरस मीटर क्षेत्रफळातील खड्डे बुजविण्यात आले आहेत. पाऊस असेल तर कोल्डमिक्स आणि पाऊस नसेल तर हॉटमिक्स व अन्य गोष्टी वापरून खड्डे बुजवले जात आहेत, असा दावा अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केला.