April 30, 2024

पुणे: अखिल खानदेश फाउंडेशन यांच्या सर्व पदाधिकारी व खानदेश बांधव यांच्या वतीने तळेगाव-चोपडा एसटी सेवेचे मोठ्या उत्साहाने स्वागत

पुणे, १६ एप्रिल २०२४: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यातर्फे रविवारी (14 एप्रिल) रोजी चाकण तळेगाव पासून चोपडा (खानदेश) इथेपर्यंत एसटी बस सेवा सुरू झालेली आहे. या बस सेवेची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर केली गेली.

आज सकाळी सात वाजता एसटी बसचे आगमन झाले तेव्हा, अखिल खानदेश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक तथा अध्यक्ष किशोर अहिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन वाघमारे, महिला पदाधिकारी तसेच सर्व खानदेश बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खानदेश विकास मंडळ तळेगाव यांचे अध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांचे पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून ही बस चालू करण्यात आली आहे. यामुळेच त्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच चाकण येथील तळेगाव चौकामध्ये सर्व खानदेशी बांधवांनी मोठ्या जल्लोषात एसटी बसचे चालक आणि वाहक यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सुद्धा सत्कार केला.

याबरोबरच बस चे पूजन करून व त्याला नारळ वाढवून खानदेशी गाण्यांच्या तालावर उत्साहाने जल्लोष साजरा केला गेला. यावेळी बापू सोनार, भरत बाविस्कर, मनोज पाटील, एकनाथ सोनवणे, हिरालाल पाटील, महेंद्र पाटील, क्षितिष पाटील, पारस सोनवणे, संदीप वानखेडे, भूषण देसले, अशोक माळी, सरला बोरसे, गीतांजली भस्मे, अर्चना गायकवाड, जयश्री जैद, विठ्ठल चांदणे, वैजनाथ मुगावकर, बसवराज हिंगमिरे, यासह अनेक खानदेशी बांधव उपस्थित होते.

सचिन वाघमारे यांनी एसटी बसचे चालक व वाहक तसेच खानदेशी प्रवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या, कौतुक केले व निर्विघ्नसेवेसाठी प्रोत्साहन सुद्धा दिले. किशोर अहिरे यांनी खानदेशी भाषेमध्ये सर्व खानदेशी बांधवांना तसेच प्रवासीना शुभेच्छा देऊन बसला मार्गस्थ केले.