October 5, 2024

निविदेला विलंब झाल्याने अभियंत्यांना नोटीस

पुणे, ४ सप्टेंबर २०२४ः पुणे महापालिकेतील पाणी पुरवठ्याच्या सुमारे ३४ निविदांना विलंब झाल्याचा ठपका ठेवत पाच अभियंत्यांसह एका लिपिकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर खुलासा करताना नव्याने वापरता आलेल्या ‘आयडब्ल्यूएमएस’ प्रणालीमुळे निविदा काढण्यास उशीर झाला असे कारण या अभियंत्यांनी दिले आहे.

पाणी पुरवठा विभागातर्फे प्रत्येक विभागातील देखभाल दुरुस्तीची कामे, वॉल्व्ह सोडण्यासाठीचे मनुष्यबळ पुरविणे, टँकर पुरविण्याच्या कामासाठी दरवर्षी निविदा काढल्या जातात. या निविदांना यावर्षी पाच हे सहा महिने विलंब झाला. यामुळे सुमारे २० कोटी रुपयांच्या ३४ निविदा रखडल्या होत्या. या विलंबामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागातील अभियंत्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. यामध्ये दोन कार्यकारी अभियंता, तीन उपअभियंत्यांना व एका लिपिकास नोटीस देऊन खुलासा करण्याचे आदेश दिले होते. या सर्वांनी खुलासा केला असून, त्यामध्ये आयडब्ल्यूएमएस प्रणाली महा इ टेंडरसोबत जोडलेली नसल्याने निविदा संच स्कॅन करण्यास विलंब झाला. २०२४-२५ चे दरपत्रक जुलै २०२४ मध्ये मंजूर झाले, त्यामुळे नवीन दराचा तुलनात्मक संच तायर करण्यास विलंब झाला, अतिरिक्त आयुक्तांची बदली झाल्याने त्यानुसार प्रस्तावात ऑनलाइन व ऑफलाइन बदल करण्यास विलंब झाला, आयडब्ल्यूएमएस प्रणालीचे सर्व्हर डाऊन होणे, पीडीएफ न उघडणे, लॉकिंग रक्कम न दिसणे अशा तांत्रिक कारणामुळे कामाला उशीर झाला असे खुलासे करण्यात आले आहेत. त्यामुळे या अभियंत्यावर कडक कारवाई न करता समज देऊन सुधारणेची संधी द्यावी असा अभिप्राय अतिरिक्त आयुक्तांकडे दिला गेला असल्याचे पाणी पुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले.