September 27, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: दहीहंडीत ध्वनीयंत्रणेसाठी लावलेला लोखंडी सांगाडा कोसळल्याप्रकरणी मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे, ०८/०९/२०२३: गणेश पेठेत ध्वनीयंत्रणा तसेच प्रकाश योजनेसाठी लावलेला लाेखंडी सांगाडा कोसळून चार ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाल्याप्रकरणी मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी श्रीकृष्ण मंडळाचे पदाधिकारी राहुल चव्हाण, अजय बबन साळुंखे, गोपी चंद्रकांत चव्हाण (तिघे रा. पांगुळ आळी, गणेश पेठ), चेतन उर्फ सनी समाधान अहिरे (रा. खराडी, नगर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश लालचंद चंगेडिया (वय ३८, रा. नाना पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुर्घटनेत मंदा लालचंद चंगेडिया (वय ६७), निर्मलादेवी नवीन पुनमिया (वय ६९), केवलचंद मांगीलाल सोलंकी (वय ६६), ताराबाई केवलचंद सोलंकी (वय ६४) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेश पेठेतील पांगुळी आळीत सादडी सदन आहे. जैन धर्मियांच्या चातुर्मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सादडी सदनच्या प्रवेशद्वारासमोर पांगुळ आळीतील श्रीकृष्ण मंडळाकडून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो.

गुरुवारी (७ सप्टेंबर) सादडी सदनच्या प्रवेशद्वारासमोर श्रीकृष्ण मंडळाने ध्वनी आणि प्रकाश योजनेसाठी मोठा लाेखंडी सांगाडा उभा केला होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास सादडी सदनच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडणाऱ्या मंदा चंगेडिया, निर्मलादेवी पुनमिया, केवलचंद सोलंकी, ताराबाई साेलंकी यांच्या अंगावर लोखंडी सांगाडा कोसळळा. दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे तपास करत आहेत.