April 20, 2026

पुणे बालपुस्तक जत्रा ३० एप्रिलपासून : विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांना आनंद घेता येणार

पुणे, दि. 20/04/2026 : ‘उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना हसत खेळत वाचनाची गोडी लागावी, कला संस्कृतीची माहिती व्हावी आणि त्यांना साहित्य संस्कृतीचा स्पर्श व्हावा, या उद्देशाने राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने पुणे बालपुस्तक जत्रेचे ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत मुलांसोबत पालक आणि शिक्षकांना नावीन्यपूर्ण कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा विनामूल्य आनंद घेता येणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रसाद मिरासदार यावेळी उपस्थित होते.

पुणे बालपुस्तक जत्रा ही राज्यातील एकमेव वेगळ्या पद्धतीची जत्रा आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना साहित्य संस्कृतीची माहिती व्हावी; तसेच त्यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांची माहिती मिळावी. या माध्यमातून त्यांना साहित्याचा स्पर्श होऊन, भविष्यात ते चांगले वाचक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. ही प्रक्रिया हसत खेळत घडावी म्हणूनच जत्रेच्या माध्यमातून मुलांचे भावविश्व उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. मुलांना घडविण्यात पालक आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे पालक आणि शिक्षकांसाठी बालसाहित्याचे सर्व भाषांमधील विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. साधारण पाच दिवस चालणाऱ्या या जत्रेत पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव

‘मागील वर्षी झालेल्या या महोत्सवाला मुलांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. सुमारे ५५ ते ६० हजार मुले या महोत्सवात सहभागी झाली होती. या महोत्सवात बालसाहित्याची ७५ दालने होती. यंदा त्यांची संख्या १०० पर्यंत वाढविण्यात आली आहे. याप्रमाणेच या वर्षी जत्रेत साहित्य आणि कलासंस्कृतीच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. जत्रा साधारण पाच दिवस चालणार असून, जत्रेत बालसाहित्याची शंभर दालने असतील. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामीण व साहसी खेळ रंगणार आहेत. खाद्यजत्रेतून खाद्यसंस्कृतीचाही आस्वाद घेता येणार आहे,’ अशी माहिती पांडे यांनी दिली.

‘या जत्रेत मुलांचे गीतरामायण, किशोर मासिकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन, बाल साहित्य लेखन स्पर्धा, मुलांचे कविसंमेलन, पपेट शो, पथनाट्य कार्यशाळा, लेखक तुमच्या भेटीला, चिंटू तुमच्या भेटीला, नाट्यनगरी कार्यशाळा, जादूचे खेळ, विविध प्रकारचे खेळ आणि प्रशिक्षण असे नावीन्यपूर्ण कार्यक्रम अनुभवता येणार आहेत. मुलांना साहित्य आणि कलेची गोडी लागावी, यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी आपल्या मुलांसोबत पुणे बाल पुस्तक जत्रेला भेट देऊन साहित्य संस्कृतीला पुढे नेण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा,’ असे आवाहन महाजन यांनी केले आहे. ‘या जत्रेत सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी,’ असे त्यांनी सांगितले.