April 27, 2024

पुणे: सदाशिव पेठेतील खोदाई लेखी परवानगीसह चलन भरूनच – महावितरणकडून स्पष्टीकरण

पुणे, दि. २७ मार्च २०२३: सदाशिव पेठमधील दोन वितरण रोहित्रांच्या वीजपुरवठ्यासाठी नवीन भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाकडून सर्वप्रथम चलन भरून लेखी परवानगी घेण्यात आली होती. यासंदर्भात नकाशा देखील सादर करण्यात आला होता असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी, की सदाशिव पेठ येथील दोन वितरण रोहित्रांचा व पर्यायाने प्रामुख्याने घरगुती व वाणिज्यिक अशा २७४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पाहणीमध्ये ११ केव्ही भूमिगत वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने वीज खंडित झाल्याचे दिसून आले. या दोन रोहित्रांना इतर वाहिनीद्वारे पर्यायी स्वरूपात वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र उन्हाळ्यामुळे वीज भार वाढत असल्याने नादुरुस्त वीजवाहिनी बदलणे आवश्यक झाले. त्यासाठी नादुरुस्त भूमिगत ११ केव्ही वाहिनीच्या जागी नवीन वाहिनी टाकण्यासाठी महानगरपालिकेकडे ९० रनिंग मीटर रस्ता खोदाईची परवानगी मागण्यात आली होती.

खोदाईसाठी दि. ११ मार्चला महावितरणकडून खोदाई शुल्काचे ५ लाख ४८ हजार ६४० रुपये (चलन क्र. १६१७०) जमा करण्यात आले. त्यानुसार पथ विभागाने दि. १३ मार्च रोजी लेखी परवानगी दिली व त्यात दि. १५ मार्च ते ३१ मार्चच्या कालावधीत संबंधित ठिकाणी खोदाई करून नवीन वीजवाहिनीचे काम पूर्ण करावे असे नमूद केले आहे. महावितरणकडून दि. २२ मार्च रोजी वाहतूक कमी झाल्यानंतर सायंकाळी खोदाईसह नवीन वीजवाहिनी टाकण्याचे कामास सुरवात करण्यात आली. मात्र ५० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर पालिकेच्या सूचनेनुसार ते सध्या थांबविण्यात आले आहे. त्यामुळे प्रथम चलन भरून व त्यानंतर लेखी परवानगी घेऊनच संबंधित ठिकाणी खोदाई केल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.