July 22, 2024

पुणे: मोटार चालकाची दादागिरी, महिला वाहतूक अमलदारासोबत हुज्जत

पुणे, दि. २१/०७/२०२३: मोटार चुकीच्या ठिकाणी पार्क केल्यामुळे संबंधिताविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्याच्या रागातून वाहन मालकाने महिला वाहतूक अमलदारासोबत हुज्जत घातली. मला ओळखले का, तुझ्याकडे बघून घेतो असे धमकावून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी वाहन मालकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. ही घटना २०जुलैला पावणेसहाच्यासुमारास नगर रस्त्यावरील मंत्री आयटी पार्कसमोर घडली.

विजय भाउसो पाटील (वय ३०, रा. पवार वस्ती, लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महिला अमलदाराने तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वाहतूक अमलदार असून २० जुलैला बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई करीत होत्या. त्यावेळी मंत्री आयटी पार्कसमोरील रस्त्यावर एकाने दोन रांगेत मोटार उभी केली होती. त्यामुळे वाहतूक अमलदाराने त्याच्याविरुद्ध ऑनलाईनरित्या दंडात्मक कारवाई केली. त्याचा राग आल्यामुळे विजयने महिला अमलदाराला अरेरारी करीत दमदाटी केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.एस. कोळळुरे तपास करीत आहेत.