रिपोर्ट : राधिका शर्मा आणि शोएब तडवी
पुणे, 31 ऑक्टोबर 2026 : माण, हिंजवडी आणि शिवाजीनगरला जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन 3 चे उद्घाटन 3 नोव्हेंबर 2026 रोजी बालेवाडी स्टेडियम येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित राहणार असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सकाळी 10.30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) माध्यमातून उभारण्यात आलेल्या या 23.203 किलोमीटर लांबीच्या उन्नत मेट्रो मार्गावर एकूण 23 स्थानके आहेत. 3 नोव्हेंबर रोजी सर्व 23 स्थानकांचे उद्घाटन होणार असले, तरी 4 नोव्हेंबरपासून सुरुवातीला 17 स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे.
बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांसाठी सुरू होण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण मेट्रो मार्ग जानेवारी 2027 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी अंदाजे 8,313 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर डिझाइन, बांधकाम, वित्तपुरवठा, संचालन आणि हस्तांतरण (DBFOT) मॉडेलअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
“प्रकल्पासाठी होणारा अतिरिक्त खर्च खासगी कंत्राटदाराकडून उचलला जाईल. त्यामुळे सरकारी यंत्रणेच्या कामकाजावर किंवा प्रवाशांवर त्याचा कोणताही आर्थिक परिणाम होणार नाही,” असे PMRDA आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी (IAS) यांनी सांगितले.
4 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून प्रवासी सेवा सुरू होणार असून, ही सेवा पुणे मेट्रोच्या लाईन 1 आणि लाईन 2 शी एकात्मिक करण्यात आली आहे. माण येथून जिल्हा व सत्र न्यायालय स्थानकापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पहिल्या ट्रेनला अंदाजे 45 मिनिटे लागतील. तर जिल्हा व सत्र न्यायालय स्थानकावरून माणच्या दिशेने जाणारी शेवटची ट्रेन रात्री 10.40 वाजता सुटेल.
अधिक जोडलेल्या पुण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अनिल कुमार सैनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “पुण्याच्या विकासाची वाटचाल ही शहरातील आयटी आणि व्यावसायिक क्षेत्राच्या विस्ताराशी जवळून जोडलेली आहे. या विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी सुरळीत आणि प्रभावी दळणवळण व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे. मेट्रो लाईन 3 ही माण-हिंजवडीमधील वेगाने विकसित होत असलेल्या आयटी हबला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे दररोजचा प्रवास अधिक निश्चित, सोयीस्कर आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल.”
ते पुढे म्हणाले, “प्रवासाचा वेळ आणि अडचणी कमी करण्यापलीकडे हा मेट्रो मार्ग शहरातील एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे नागरिकांना विविध संधींशी जोडता येईल आणि शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. अधिक चांगली जोडणी, सुलभ वाहतूक आणि भविष्यातील विकासाच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम असलेले पुणे घडविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा आहे.”
जिल्हा व सत्र न्यायालय मेट्रो स्थानकावर प्रवाशांना लाईन 3 वरून सध्याच्या मेट्रो नेटवर्कमध्ये प्रवासासाठी मार्ग बदलण्याची (इंटरचेंज) सुविधा उपलब्ध होणार आहे.
या मार्गावर तीन डब्यांच्या 22 मेट्रो ट्रेन धावणार असून, प्रत्येक ट्रेनमध्ये उभ्या प्रवाशांसह सुमारे 1,000 प्रवाशांची क्षमता असेल. गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी, तर गर्दी नसलेल्या वेळेत दर 10 ते 12 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांना तिकिटांसाठी Maha Metro Pune 1 ॲप, व्हॉट्सॲप तिकीट सेवा, स्थानकांवरील तिकीट काउंटर आणि तिकीट व्हेंडिंग मशीनचा वापर करता येणार आहे. याशिवाय, महा मेट्रोची सध्याची स्मार्ट कार्ड सुविधाही स्वीकारली जाणार आहे.
मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी पीएमपीएमएल बससेवा आणि फीडर कनेक्टिव्हिटीचे नियोजन करण्यात येत आहे. अतिरिक्त बसमार्ग आणि वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी, रिक्षा संघटना आणि खासगी वाहतूक सेवा पुरवठादारांशी चर्चा सुरू आहे. यामध्ये रामवाडी ते खराडी आयटी पार्कदरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढविण्याचाही समावेश आहे.
ऑक्टोबर 2026 पर्यंत या प्रकल्पाचे 98.20 टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. तसेच, 17 मेट्रो स्थानकांवर सुमारे 340 सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

More Stories
पुणे महापालिकेच्या १८ हजार कर्मचाऱ्यांना बोनसचा निर्णय जाहीर,
पाण्याची नासाडी केल्यास दंड; तिसऱ्यांदा गुन्हा
पुण्यासाठी पुढील आॅगस्टपर्यंत १३ टीएमसी पाणी राखीव, कालवा समितीचा निर्णय