पुणे, 19 मे 2026: नीट पेपरफुटी प्रकरणात मॉडर्न महाविद्यालयाच्या एका कर्मचाऱ्याचा संबंध असल्याच्या आरोपावरून काँग्रेसने सोमवारी महापालिकेत जोरदार आंदोलन केले होते. या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि मॉडर्न महाविद्यालय प्रशासनाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली असून, संबंधित कर्मचाऱ्याला यापूर्वीच निलंबित केल्याचे जाहीर केले आहे.
महाविद्यालयातील मनीषा मांढरे या शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्याचे नाव पेपरफुटी प्रकरणात आल्यानंतर, संस्थेने याची गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावलीनुसार (MEPS), मांढरे यांना १६ मे २०२६ पासूनच महाविद्यालयाच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसने केलेल्या आंदोलनात संस्थेवर जे आरोप केले होते, त्याला उत्तर देताना कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली.
संस्थेची प्रतिमा जपण्याचे आवाहन
“१९३४ पासून कार्यरत असलेल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा इतिहास उज्ज्वल आहे. एका कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक चुकीमुळे ४,५०० कर्मचारी असलेल्या आणि हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या ९० वर्षांच्या प्रतिष्ठित संस्थेला दोषी धरणे अन्यायकारक आहे,” असे निवेदन शिक्षक व कर्मचारी वर्गाने प्रसिद्ध केले आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे आणि प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांनी पारदर्शक भूमिकेतून ही कारवाई केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राजकीय हेतूने संस्थेची विनाकारण बदनामी करू नये आणि वस्तूस्थिती समजून घ्यावी, अशी विनंतीही या खुलाशाद्वारे करण्यात आली आहे.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन