April 29, 2024

यूपीएससी परीक्षेत चाणक्य मंडलचे घवघवीत, अखिल भारतीय यश

पुणे, १६ एप्रिल: नुकताच केंद्रीय लोक सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून चाणक्य मंडलच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे घवघवीत यश संपादित केले आहे. भारतात दुसरा आलेला अनिमेश प्रधान, सहावी आलेली सृष्टी डाबस व महाराष्ट्रात पहिला आलेला कुश मोटवानी यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये परीक्षेच्या विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतले आहे. चाणक्य मंडल परिवारच्या यूपीएससी कोर्सचा विद्यार्थी समर्थ शिंदे याने पहिल्याच प्रयत्नात, वयाच्या केवळ २२ व्या वर्षी देशात २५५ वा रँक मिळवला आहे. सध्या समर्थ चाणक्य मंडलमध्ये इतरांनाही मार्गदर्शन करतो.

देशात ११ वा आलेल्या कुश मोटवानी याने धर्माधिकारी सरांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाचा खूप उपयोग झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. चाणक्य मंडलचा विद्यार्थी-प्राध्यापक समर्थ म्हणाला, धर्माधिकारी सरांची अनेक व्याख्याने ऐकत आलो. यूपीएससी परीक्षेची संपूर्ण तयारी चाणक्य मंडल मधूनच करण्याचं आपण पक्कं केलं होतं. पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच मुलाखतींसाठी चाणक्य मंडलमधील अनेकांचे मार्गदर्शन मिळाले.

यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून एकूण १०१६ जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यांपैकी तब्बल ३०६ विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतले आहे. संपूर्ण भारतात पहिल्या १० मध्ये ३, पहिल्या २० मध्ये ६, पहिल्या ५० मध्ये १७ तर पहिल्या १०० पैकी ३२ विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये परीक्षेसंबंधी मार्गदर्शन घेतले.

स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी घडवण्यासाठी कार्यरत असलेली संघटना, अशी चाणक्य मंडल परिवारची ओळख आहे. केंद्रीय लोकसेवा (यूपीएससी) परीक्षेत विक्रमी निकाल नोंदवत असतानाच यावर्षी निवडले गेलेले चाणक्य मंडलचे विद्यार्थी देशाच्या जवळपास सर्व राज्यांतून आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये परीक्षेच्या विवध टप्प्यांवर मार्गदर्शन घेत संपूर्ण कोर्सदेखील पूर्ण केला आहे तर काही विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेसाठी आणि मुलाखतीसाठी विशेष मार्गदर्शन घेतले आहे.

मागील सहा वर्षांपासून चाणक्य मंडल दिल्लीतही अभिरूप मुलाखतींचे आयोजन करत असून देशभरातातील हजारो विद्यार्थ्यांचा त्याला उत्स्फूर्त आणि वाढता प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीदेखील मुलाखतीचं मार्गदर्शन, स्वतः धर्माधिकारी सरांचं समुपदेशन आणि अभिरूप मुलाखतींना भारतभरातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चाणक्य मंडलचे संस्थापक आणि संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी प्रशासन स्वच्छ आणि कार्यक्षम ठेवत उत्तम काम करणारे ‘कार्यकर्ता अधिकारी’ होण्यासाठी यशस्वीतांना शुभेच्छा दिल्या.