पुणे, ०६/०४/२०२३: पुण्यातील कोंढवा भागात एक धक्कादायक घटना घडली असून, दोन चिमुकल्यांसह तिच्या आईचा चुलत दिराने खून करून जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयातून चुलत दिराने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे.
आम्रपाली वाघमारे (वय ३०) रोशनी (वय ६) आणि आदित्य अशी खून झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिराला ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आला आहे.
चुलत दीर व आम्रपाली यांच्यात प्रेम संबंध होते. ते वर्षभरापूर्वी पुण्यात रहायला आले होते.
आम्रपाली यांचा विवाह झालेला होता; पण प्रेमातून त्या चुलत दिरासोबत येथे पळून आलेल्या होत्या. कोंढवा येथील पिसोळी भागात ते राहत होते. दोन मुले, आम्रपाली आणि चुलत दीर असे राहत असताना चुलत दिराला तिचे दुसऱ्याशी संबंध आहेत, असा संशय होता. त्यावरून ही घटना घडली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान रात्री त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्याने प्रथम आम्रपाली यांना ठार मारले. त्यानंतर मूल रडत असल्याने त्यांनाही मारले. त्यानंतर या तिघांना जाळले. हा प्रकार समोर येताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पसार झालेल्या दीर याचा शोध घेऊन पकडले. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

More Stories
तुकाराम ओंबाळे यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक: पोलीस आयुक्त अमितेश कुमार
‘डीजेच्या वादात पडू नका’; सांस्कृतिक गणेशोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
डीजेनंतर आता ढोल-ताशांवरही बापट यांचा आक्षेप; ‘परंपरेच्या नावाखाली ध्वनिप्रदूषणाचे समर्थन नको’