September 15, 2026

खेड-शिवापूर परिसरात दुर्मिळ खवले मांजराचे रेस्क्यू; सुरक्षित वनपरिक्षेत्रात मुक्तता

पुणे, दि. 8 सप्टेंबर 2026 : पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर परिसरात रात्रीच्या सुमारास एका घराजवळ दुर्मिळ खवले मांजर आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेत खवले मांजराची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक वनपरिक्षेत्रात मुक्त करण्यात आले.

मांजरासारखा दिसणारा एक वन्यजीव घराजवळ आढळल्याची माहिती स्थानिकांकडून रेस्क्यू पथकाला मिळाली होती. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तो दुर्मिळ आणि संरक्षित खवले मांजर असल्याचे स्पष्ट झाले.

संस्थेचे कार्याध्यक्ष रघुनाथ वाडकर यांच्यासह वन्यजीव रक्षक विनायक मोहिते, संतोष पाटील, सोन्या कांबळे आणि मधुर अवसरे यांनी अत्यंत काळजीपूर्वक खवले मांजराचे रेस्क्यू केले. याबाबत संस्थेचे अध्यक्ष सुशील विभूते आणि उपाध्यक्ष शंकर वाडकर यांना माहिती देण्यात आली.

त्यानंतर सुशील विभूते यांनी नसरापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. खवले मांजराच्या शरीरावर कोणतीही जखम अथवा दुखापत झाली आहे का, याची तपासणी करण्यात आली. त्याची प्रकृती उत्तम असल्याचे आढळल्यानंतर वनरक्षक ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला सुरक्षितपणे वनपरिक्षेत्रात मुक्त करण्यात आले.

खवले मांजर हा दुर्मिळ आणि संरक्षित वन्यजीव असून त्याची बेकायदेशीर शिकार आणि तस्करी होत असल्याने त्याच्या संवर्धनाला विशेष महत्त्व आहे. नागरिकांनी असा वन्यजीव आढळल्यास त्याला त्रास न देता तातडीने वनविभाग किंवा अधिकृत वन्यजीव रेस्क्यू पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, खेड-शिवापूर परिसरात सुरू असलेली रिंग रोडची कामे, विविध विकास प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणावर होणारे उत्खनन यामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होत असल्याचे वन्यजीव रक्षकांनी सांगितले. अधिवास आणि अन्नाच्या शोधात वन्यजीव मानवी वस्त्यांच्या दिशेने येत असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

वनविभागाचे आवाहन

“खवले मांजर हा संरक्षित वन्यजीव आहे. नागरिकांनी अशा वन्यजीवांना कोणताही त्रास न देता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.”

— वसंत चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, नसरापूर

विकासकामांमुळे अधिवासाला धोका

“काही वर्षांपूर्वीही या परिसरात खवले मांजर आढळले होते. वाढती विकासकामे आणि उत्खननामुळे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास कमी होत आहे. वन्यजीव रक्षकांना आवश्यक साधनसामग्री आणि मदत मिळणे गरजेचे आहे.”

— सुशील विभूते, अध्यक्ष, पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन

२५ वर्षांपासून वन्यजीव संरक्षणासाठी कार्य

पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन गेल्या २५ वर्षांपासून वन्यजीव बचाव आणि संरक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. विविध वन्यजीवांचे रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडण्याचे काम संस्थेकडून सातत्याने केले जात आहे. मात्र, या कार्यासाठी अद्याप शासकीय, निमशासकीय संस्था किंवा लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित सहकार्य आणि मदत मिळत नसल्याची खंत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.