पुणे, दि. १५ सप्टेंबर, २०२३ : पुण्याची ओळख असलेल्या शनिवारवाड्यासमोरील दगडी कमानीचा देखणा नवा पूल अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पूल म्हणजे अवघे १०० वर्षे वयमान असलेला पूल होय. मुठा नदीवर १९२३ साली काळ्या बसाल्ट खडकातून, अर्धवर्तुळाकार सज्जे असलेला हा पूल ब्रिटीश काळात बांधला गेला. पुण्यातील राव बहादूर गणपतराव केंजळे यांनी या पुलाचे बांधकाम केले असून या पुलाला १०० वर्षे पूर्ण होत असताना त्यांचे वंशज असलेल्या केंजळे कुटुंबियांकडून या निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या रविवार दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुलाच्या शनिवारवाड्याच्या बाजूला एका कोनशिलेचे अनावरण करण्यात येईल. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, रमेश केंजळे, मिलिंद केंजळे, कुबेर केंजळे आणि इतर केंजळे कुटुंबीय यावेळी उपस्थित असतील.
याबद्दल अधिक माहिती देताना राव बहादूर गणपतराव केंजळे यांचे वंशज असलेले अभिजित केंजळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज पुलाची खासियत म्हणजे समोर ऐतिहासिक शनिवारवाडा, बाजूला पुणे महानगरपालिका आणि खाली पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीतील पीएमपीएमएल ही होय. आज हा पूल आपली १०० वर्षे पूर्ण करीत आहे. १९२३ साली १७ सप्टेंबर रोजी मुंबई इलाख्याचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज लॉईड यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल ई. एस प्रोज हे त्यावेळी ब्रिटीश आमदानीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव होते. त्यांनी या पुलाची रचना केली तर पुण्यातील राव बहादूर गणपतराव केंजळे यांनी त्याचे बांधकाम केले. आधी हा पूल जॉर्ज लॉईड या नावाने ओळखला जायचा. स्वातंत्र्योत्तर काळात छत्रपती शिवाजी महाराज पूल असे त्याचे नामकरण करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने या पुलाला ग्रेड २ हेरिटेज वास्तूचा दर्जा देखील देण्यात आला आहे. ”
बसाल्ट खडकातून उभारलेला, अर्धवर्तुळाकार सज्जे असलेला, प्रत्येक बुरुजाच्या दोन्ही बाजूस फुलांची सुंदर नक्षी असलेला आणि दोन्ही बाजूस दगडी पायऱ्या असलेला हा पूल भांबुर्डा गावाला जोडणारा पूल आहे. या पुलामुळे भांबुर्डा गाव पुण्याशी जोडले गेले आणि पुण्याची पूर्व व पश्चिम अशी विभागणी झाली, असेही अभिजित केंजळे यांनी सांगितले.
या कोनशीला अनावरण कार्यक्रमानिमित्त पुलाची स्वच्छता करीत, रांगोळीच्या पायघड्या घालत पुलाची सजावट करण्यात येईल, रंगरंगोटी करीत ढोल ताशाच्या गजरात १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या कोनशीलेचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थित होईल. या निमित्ताने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात येईल. याशिवाय या कार्यक्रमाचे औचित्य साधत एका विशेष माहितीपटाची निर्मिती आम्ही केली असून त्याचे प्रकाशन कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे विशेष सहकार्य लाभले असून पुणेकर नागरिकांनीही १७ तारखेला दुपारी ३ वाजता होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या जल्लोषात सहभागी होण्याचे आवाहन केंजळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘दगडूशेठ’ गणपतीची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता मार्गस्थ