पुणे, दि. ४ एप्रिल, २०२६ : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य, सुपुत्र आणि किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी, पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं. शौनक अभिषेकी यांच्या घराणेदार गायनाने २८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस संपन्न झाला.
गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा तीन दिवसीय कलाश्री संगीत महोत्सव यावर्षी रविवार दि. ५ एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आला असून पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे तो संपन्न होत आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे. आजच्या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या विश्वस्त शिल्पा जोशी, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. सुधाकर चव्हाण, कलाश्रीचे विश्वस्त सच्चिदानंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कलाश्री व राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन व वादनाचा कार्यक्रमाने झाली. यानंतर श्रीनिवास जोशी यांनी समयोचित असा राग मारवा प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी ‘अब मिल आये…’ ही विलंबित एकतालातील बंदिश पेश केली. यानंतर ‘गुरु बिन ग्यान…’ हा तीनतालातील छोटा ख्याल गायला. ‘आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलीया…’ या संत तुकाराम यांचा राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी गाऊन अजरामर केलेला लोकप्रिय अभंग सादर करीत त्यांनी विराम घेतला. श्रीनिवास जोशी यांना रमाकांत राऊत (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी), रवी पांचाळ, मंदार रत्नपारखी (तानपुरा) आणि गंभीर महाराज अवचार यांनी साथसंगत केली.
यानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे कुलसचिव आणि तबलावादक पं विश्वास जाधव यांचे एकल तबलावादन रंगले. पं. जाधव यांनी पेशकार, कायदे आणि रेला यांचे बहारदार सादरीकरण करीत सुरुवात केली. त्यांनी सादर केलेल्या पारंपरिक बंदिशींना उपस्थितांनी दाद दिली. पं. विश्वास जाधव यांना जीतेश जवार, वैभव कदम यांनी तबला तर गंगाधर शिंदे यांनी संवादिनीवर साथसंगत केली.
कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं. शौनक अभिषेकी यांच्या सुमधुर शास्त्रीय गायनाने झाला. श्रीकांत चौघुले यांनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे सूत्रसंचालन केले.

More Stories
पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 409 खेळाडू सहभागी
पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत क्लब ऑफ महाराष्ट्र, ट्रिनिटी, आर्यन्स क्रिकेट अकादमी, ॲबिशियस, पीबीसीए संघांची विजयी सलामी
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत संगम स्पोर्ट्स क्लब, सीएमएस फाल्कन्स संघांचे विजय