August 23, 2026

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी सीओईपीमध्ये एबीव्हीपी-काँग्रेसमध्ये राडा

पुणे, २१ आॅगस्ट २०२६ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा परिसर राजकीय आखाडा बनला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी दिलेल्या पाठिंब्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि काँग्रेस-एनएसयूआयचे कार्यकर्ते शुक्रवारी सायंकाळी आमनेसामने आले. घोषणाबाजी, बाचाबाची आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती चिघळण्यापूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना बाजूला केले.

सीओईपीच्या वसतिगृह परिसरात विद्यार्थिनींनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या समर्थनार्थ तयार केलेल्या रील्स आणि कार्यक्रमातील सहभागावरून वादाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांवर वसतिगृहात घुसून विद्यार्थिनींना मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला.

या आरोपांनंतर अभाविपचे कार्यकर्ते वसतिगृह परिसरातून सीओईपीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमा झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्याचवेळी एसएसपीएमएसच्या परिसरात उपस्थित असलेले काँग्रेसचे कार्यकर्तेही तेथे आल्याने दोन्ही गट आमनेसामने आले. काही काळ जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे परिसरात तणाव वाढला.

अभाविपचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी काँग्रेस आणि एनएसयूआयवर गंभीर आरोप केले. राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी प्रेक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचा दावा त्यांनी केला. सीओईपीसारख्या नामांकित संस्थेच्या परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते घुसून विद्यार्थिनींना मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी हे आरोप फेटाळत विद्यार्थिनींच्या प्रश्नांना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार असून राहुल गांधी हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, पुणे शहर काँग्रेसचे पूर्व विभागाध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात जाणीवपूर्वक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिला. विद्यार्थिनींना दमबाजी करून कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत काँग्रेस विद्यार्थिनींच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी उपद्रवी घटकांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा काँग्रेस आपल्या पद्धतीने उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

शनिवारी (ता. २२) एसएसपीएमएसच्या मैदानावर राहुल गांधी यांचा ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमापूर्वीच सीओईपीमध्ये दोन राजकीय विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या या संघर्षामुळे पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढविला आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सीओईपी आणि परिसरातील हालचालींवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.