September 4, 2026

तुकाराम ओंबाळे यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक: पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुणे, 3/8/2024: “गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव आहे. हा उत्सव उत्साहात तसेच शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी नागरिक, गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासन या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे,” असे मत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले. तुकाराम ओंबाळे यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आनंदनाथ ट्रस्ट आणि राष्ट्रप्रथम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित ‘पुणे दहीहंडी महोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी अमितेश कुमार बोलत होते. ‘महाराष्ट्र पोलिस कृतज्ञता’ या संकल्पने अंतर्गत पोलिसांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई येथे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तुकाराम ओंबाळे यांच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. अजमल कसाब याला पकडताना वीरमरण आलेल्या ओंबाळे यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने त्यांची २० फूट उंच आणि १६ फूट रुंद भव्य प्रतिमा तयार करण्यात आली आहे.

यावेळी पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे, गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक शर्मिला सुतार, पोलिस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलिस निरीक्षक समाधान पवार, ओंबाळे यांची कन्या वंदना ओंबाळे, त्यांचे पती राजेंद्र माईके, उद्योजक चैतन्य रांगणेकर, पुणे दहीहंडी महोत्सवाचे अध्यक्ष वैभव वाघ, अथर्व पिसाळ, अनिल बटाणे उपस्थित होते.

अमितेश कुमार म्हणाले, पुण्याचा गणेशोत्सव जागतिक स्तरावर न्यायचा असेल तर नव्याने ‘पुणे पॅटर्न’ तयार करावा लागेल. यावर्षी मंडळांनी आणि सर्वांनी योग्य पद्धतीने उत्सवात साथ देण्याचे ठरवले आहे, त्यामुळे उत्सव निर्विघ्नपणे पार पडेल अशी आशा आहे. सर्व मंडळांनी सामाजिक भान राखत उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवायला हवेत.

वैभव वाघ म्हणाले, पोलिस दल अहोरात्र आपल्या सेवेसाठी सज्ज असते. उत्सव आणि एरवीही त्यांच्यावर कामाचा ताण असतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. दहीहंडी महोत्सवाच्या निमित्ताने दशावतार, भगवदगीता पठण, आपकी फर्माईश हा गाण्यांचा कार्यक्रम, खान्देशातील विविध नृत्यप्रकार सादर होणार आहेत.