April 24, 2024

पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलची विजयी सलामी

पुणे, 20 फेब्रुवारी 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत भारताच्या अव्वल मानांकित सुमित नागल याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या सिद्धांत बांठिया व परिक्षित सोमानी या जोडीने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत एकेरीत भारताच्या जागतिक क्रमवारीत 93व्या स्थानी असलेल्या सुमित नागल याने तैपेईच्या यु सिओ सुचा 7-6(6), 6-4 असा पराभव केला. हा सामना 2तास 6मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला सहाव्या गेमपर्यंत दोघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या त्यामुळे सामन्यात 3-3अशी बरोबरी निर्माण झाली. सातव्या गेममध्ये सुमितने युची सर्व्हिस ब्रेक केली व आघाडी घेतली. पण हि आघाडी फार काळ टिकली नाही. यु याने सुमितची दहाव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व बरोबरी साधली. सामन्यात बरोबरी झाल्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये सुमितने वरचढ खेळाचे प्रदर्शन करत हा सेट 7-6(6) असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या यु याने जोरदार खेळ करत पहिल्या व तिसऱ्या गेममध्ये सुमितची सर्व्हिस भेदली. सुमितने आपले अनुभव पणाला लावत चौथ्या गेममध्ये युची सर्व्हिस ब्रेक केली. सुमितने आपला दबदबा कायम ठेवत दहाव्या गेममध्ये युची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-4 असा जिंकून विजय मिळवला.

रशियाच्या लेक्सी झाखारोव्ह याने ग्रेट ब्रिटनच्या सहाव्या मानांकित ऑलिव्हर क्रॉफर्डचा 7-6(4), 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. चुरशिच्या लढतीत फ्रांसच्या एन्झो कौकौडने ऑस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिकला 6-4, 6-2 असे पराभूत केले. सातव्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या डॅनी स्विनी याने फ्रान्सच्या मॅक्सिम जेन्व्हियरचा टायब्रेकमध्ये 4-6, 6-1, 7-6(4) असा पराभव करून आगेकूच केली. ग्रेट ब्रिटनच्या क्वालिफायर फेलिक्स गिल याने हॉंगकॉंगच्या कोलमन वोंगचा 7-6(4), 4-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली. पोलंडच्या मॅक्स कास्निकोव्हस्कीने कोरियाच्या सेओंगचान हाँगचा 6-4, 6-2 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या मानांकित ॲडम वॉल्टन याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या बेलारूसच्या राफेल कॉलिग्नॉनला 7-6(1), 6-2 असे पराभूत केले.

पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत.

दुहेरीत पहिल्या फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या सिद्धांत बांठिया व परिक्षित सोमानी या जोडीने स्वित्झर्लंडच्या लुका मार्गारोली व पोर्तुगालच्या गोंकालो ऑलिव्हिरा यांचा 7-5, 6-7(5), 10-5 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. जपानच्या तोशिहिदे मत्सुई व कायतो युसुगी या जोडीने भारताच्या एन.श्रीराम बालाजी व जर्मनीच्या आंद्रे बेगेमन यांचा 4-6, 7-6(5), 10-5 असा पराभव करून आगेकूच केली.

निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी:
सुमित नागल(भारत)[1]वि.वि.यु सिओ सु(तैपेई)7-6(6), 6-4;
एन्झो कौकौड (फ्रांस)वि.वि.बर्नार्ड टॉमिक(ऑस्ट्रेलिया) 6-4, 6-2;
डॅनी स्विनी (ऑस्ट्रेलिया) [7]वि.वि.मॅक्सिम जेन्व्हियर (फ्रांस) 4-6, 6-1, 7-6(4);
फेलिक्स गिल (ग्रेट ब्रिटन)वि.वि.कोलमन वोंग (हॉंगकॉंग)7-6(4), 4-6, 6-3;
मॅक्स कास्निकोव्हस्की(पोलंड)वि.वि.सेओंगचान हाँग(कोरिया) 6-4, 6-2;
ॲडम वॉल्टन(ऑस्ट्रेलिया) [3]वि.वि राफेल कॉलिग्नॉन(बेलारूस)7-6(1), 6-2;
अलेक्सी झाखारोव्ह(रशिया)वि.वि. ऑलिव्हर क्रॉफर्ड(ग्रेट ब्रिटन)[6]7-6(4), 6-3;
व्हॅलेंटिन व्हॅचेरोट(मॉन) [4] वि.वि. वासेक पोस्पिसिल(कॅनडा)6-3, 7-5;
ट्रिस्टन बॉयर (अमेरिका)वि.वि.ओरिओल रोका बटाल्ला(स्पेन)6-2, 4-6, 6-2;

दुहेरी गट: पहिली फेरी:
तोशिहिदे मत्सुई (जपान)/कायतो युसुगी(जपान)वि.वि.एन.श्रीराम बालाजी(भारत)/आंद्रे बेगेमन(जर्मनी) [४] 4-6, 7-6(5), 10-5;
सिद्धांत बांठिया(भारत)/परिक्षित सोमानी(भारत)वि.वि लुका मार्गारोली(स्वित्झर्लंड)/गोंकालो ऑलिव्हिरा(पोर्तुगल)7-5, 6-7(5), 10-5.