May 13, 2024

कीडस इलेव्हन, मध्य रेल्वेची आगेकूच

पुणे २८ जून २०२३ – कीडस इलेव्हन आणि मध्य रेल्वे (सेंट्रल रेल्वे) संघांनी बुधवारी परस्पर विरोधी विजय मिळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.
नेहुरनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत किडस इलेव्हनने एका गोलच्या पिछाडीनंतर पूना हॉकी अकादमी संघाचा शूट-आऊटमध्ये ३-१ असा पराभव केला. नियोजित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता. दिवसातील दुसऱ्या सामन्यात आदित्य रसाळच्या तीन गोलच्या जोरावर मध्य रेल्वे संघाने पुणे शहर पोलिस संघाचा ८-० असा धुव्वा उडवला.
पहिल्या सामन्यात अशफाक शेखने आठव्याच मिनिटाला गोल करून पूना हॉकी अकादमी संघाला झटपट आघाडी मिळवून दिली होती. विश्रांतीपर्यंत पूना हॉकी संघाने आघाडी कायम राखली होती. उत्तरार्धात ४८व्या मिनिटाला किडस इलेव्हनने अभिषेक अस्पातच्या गोलने बरोबरी साधली. बरोबरीनंतर अखेरच्या सत्रात दोन्ही संघांनी कमालीचा वेगवान खेळ करून गोल करण्याच्या संधी मिळविण्याचे अथक प्रयत्न केले. यात प्रथम ५८व्या मिनिटाला शुभम ठाकूरने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून किडस इलेव्हनला बरोबरी साधून दिली. पण, पुढच्याच मिनिटाला मनोज पिल्लेने किडस इलेव्हनचा गोल करून सामना २-२ बरोबरीत सोडवला.
विजयासाठी घेण्यात आलेल्या शूट आऊटमध्ये किडस इलेव्हनकडून संकेत हिरे, स्वप्नील ढेरे, शुभ ठाकूर यांनी आपले प्रयत्न यशस्वी केले. पूना हॉकी संघाकडून केवळ संकेत पाटोळेलाच गोल करता आला. किडसकडून रिहान शेख, अभिषेक अस्पात, तर पूना हॉकीकडून वंश परदेशी, हुसेन शेख, रोहन रापोळ यांना गोलजाळीचा वेध घेण्यात अपयश आले.
दुसर्या सामन्यात मध्य रेल्वे, पुणे संघाने आदित्य पिसाळच्या (२०, ५०, ५२वे मिनिट) तीन गोलच्या जोरावर पुणे शहर पोलिस संघाचा दणदणीत पराभव केला. विनित कांबळी (३१, ४४वे मिनिट) आणि स्टिफन स्वामी (४थे, २२वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल करून आदित्यला सुरेख साथ केली. अन्य एक गोल गोविंद नागने (१७वे मिनिट) केला.
निकाल –
किडस इलेव्हन २ (३) (अभिषेक अस्पात ४८वे,शुभम ठाकूर ५८वे मिनिट (कॉर्नर), संकेत हिरे, स्वप्निल ढेरे, शुभम ठाकूर) वि.वि. पूना हॉकी अकादमी २(१) (अशफाक शेख ८वे मिनिट, मनोज पिल्ले ५९वे मिनिट, संकेत पाटाळे) मध्यंतर ०-१
मध्य रेल्वे (सेंट्रल रेल्वे) ८ (स्टिफन स्वामी ४थे, २२वे मिनिट, आदित्य रसाळ २०वे, ५०वे, ५२वे मिनिट, विनित कांबळे ३१वे, ४४वे मिनिट) वि.वि. पुणे सिटी पोलिस ०. मध्यंतर ३-०