May 13, 2024

पुणे: ‘दगडूशेठ’ च्या अयोध्या श्रीराम मंदिर सजावटीचे उद्घाटन

पुणे, १९/०९/२०२३: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या सजावटीचे उदघाटन औसा संस्थान, नाथ संस्थांनचे पिठाधीपती प.पू. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली. मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. प्रतिकृतीमध्ये २४ खांब व २४ कमानी उभारण्यात आले आहेत. मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे १०८ फूट उंच मंदिर आहे. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव ११ कळस आहेत.

मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये ६० खांबांवर वानरसेनेच्या मूर्तींसह रामायणातील घटनांचा आढावा हा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात आला आहे. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात आला आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हे देखील यंदाचे आकर्षण आहे. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील लक्षवेधी ठरणार आहेत.