May 13, 2024

पुणे: तृतीयपंथी समाजसेविका अमित उर्फ आम्रपाली मोहिते यांच्या हस्ते गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना

पुणे, १९/०९/२०२३: आम्हाला दया नको तर समान वागणूक हवी, असे तृतीयपंथी समाजसेविका अमित उर्फ आम्रपाली मोहिते यांनी ‘स्व-‘ रूपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेच्या “श्रीमकांचा बाप्पा” उपक्रमात बोलताना व्यक्त केले. यावेळी आम्रपाली यांच्या हस्ते गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

आम्रपाली यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना तृतीयपंथी समाजाच्या व्यथा मांडल्या. “तृतीयपंथींना सहानुभुती नव्हे तर समान वागणुकीची गरज आहे. ते ही आपल्या समाजातील एक घटक आहेत हे मान्य करून त्यांना आपलेपणाने स्वीकारा. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या”, असे आम्रपाली यांनी सांगितले.

आम्रपाली सावली सोशल फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. तृतीयपंथींच्या न्याय हक्कासाठी काम करताना त्यांनी पुणे शहरात सहा ठिकाणी गरीब मुलांसाठी ‘फुटपाथ शाळा’ सुरु केल्या. आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी १४५ गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उभा केला, तसेच १९२ लोकांना छोटे व्यवसाय सुरु करून दिले आहेत.

‘स्व-‘ रूपवर्धिनी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ संजय तांबट, संस्थेच्या जेष्ठ पूर्णवेळ कार्यकर्त्या पुष्पाताई नडे यांनी आम्रपाली मोहितेंचा भारतीय संविधानाचा सरनामा देऊन सन्मान केला.