पुणे, २७ जुन २०२३: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एलिमिनेटर लढतीत रोहन दामले(२-२३) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीसह अद्वैय शिधये(नाबाद २७)ने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर पुणेरी बाप्पा संघाने ईगल नाशिक टायटन्स संघाचा ३ गडी राखून पराभव करत क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून ईगल नाशिक टायटन्स संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. याआधी साखळी फेरीत ईगल नाशिक टायटन्स संघाने पुणेरी बाप्पा संघाविरुद्ध १ धावेने थरारक विजय नोंदवला होता. त्याच पराभवाची परतफेड करत पुणेरी बाप्पा संघाने ईगल नाशिक टायटन्स संघावर विजय मिळवला.
पॉवर प्ले संपेपर्यंत पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसलेच्या भेदक माऱ्यापुढे नाशिक संघाने मंदार भंडारी(१३धावा), कौशल तांबे(४धावा) हे वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे नाशिकची ४.४ षटकात २बाद ३४ धावा अशी स्थिती बिकट होती. या स्पर्धेत प्रथमच सलामीला आलेल्या राहुल त्रिपाठीने चौफेर फटकेबाजी करत ४१ चेंडूत ६० धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. राहुलने ९ चौकार व १ षटकाराची खेळी केली. राहुल व सिद्धेश वीर या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी २६ चेंडूत ४१ धावांची भागीदारी केली. सिद्धेशला रोहन दामलेने यष्टीचीत बाद करून संघाला तिसरा धक्का दिला. त्यानंतर पुण्याच्या रोहन दामलेने वरुण देशपांडे(१२धावा)ला त्रिफळा बाद करून नाशिकची चिंता आणखी वाढवली.
राहुल त्रिपाठी ६० धावांवर खेळत असताना सोहन जमालेने आपल्याच गोलंदाजीवर स्वतः झेल पकडून मोक्याच्या क्षणी त्याला बाद केले व सामन्याला नवीन वळण मिळाले. नाशिकचा धावफलक त्यावेळी १४ षटकात ५बाद १०७ धावा असा होता. पाठोपाठ आदित्य राजहंस(३धावा)ला सोहनने त्रिफळा बाद केले व सामन्यातील सस्पेंस वाढवला. नाशिकच्या धनराज शिंदेने १२ चेंडूत २ षटकारासह १८ धावा काढून धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण पियुष साळवीने धनराजला झेल बाद करून त्याचा अडसर दूर केला. नाशिक संघाने १८ षटकात ८ बाद १३१धावांचे आव्हान उभे केले. पुणेरी बाप्पा संघाकडून सोहन जमाले(२-१९), रोहन दामले(२-२३), सचिन भोसले(२-१७)यांनी सुरेख गोलंदाजी केली.
१३२ धावांचे आव्हान पुणेरी बाप्पा संघाने पवन शहा व शुभम तैस्वाल या सलामीच्या जोडीने २६ चेंडूत ३४ धावांची भागीदारी केली. शुभम तैस्वाल १० चेंडूत १० धावा काढून धावचीत बाद झाला, तर पवन शहाने २० चेंडूत २५ धावा काढल्या. त्याने २चौकार व १ षटकार खेचला. पवनला रेहान खानने झेल बाद करून तंबूत परत पाठवले. त्याचा झेल इझान सय्यदने टिपला. त्यानंतर यश क्षीरसागरने २४ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने २५ धावांची संयमी खेळी केली. यश क्षीरसागर व रोहन दामले यांनी चौथ्या विकेटसाठी २१ चेंडूत २५ धावांची भागीदारी केली. यश क्षीरसागरला २५ धावांवर रेहान खानने पायचीत बाद केले व पुण्याला चौथा धक्का दिला. तर, कर्णधार रोहन दामलेला १७ धावांवर असताना नाशिकच्या प्रशांत सोळंकीला उत्तुंग फटका मारताना झेल बाद झाला. पुण्याला विजयासाठी १८ चेंडूत २६ धावांची आवश्यकता असताना अद्वैय शिधयेने १३ चेंडूत नाबाद २७ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. अद्वैयने १ चौकार व २ षटकार मारला. शेवटच्या षटकात ३ चेंडूत ७ धावांची गरज असताना अव्दैयने षटकार खेचला व पुढच्याच चेंडूवर एक धाव घेत संघाला विजय मिळवून दिला. ईगल नाशिक टायटन्सकडून रेहान खान(३-२०), अक्षय वाईकर(२-२६), प्रशांत सोळंकी(१-२८)यांनी अचूक गोलंदाजी केली.
More Stories
चौथी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धा उद्यापासून
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यातील हॉकी दिग्गजांचा सन्मान
पुणेकरांची ऐतिहासिक कामगिरी पॅरिस ऑलिम्पिकसाठी ‘पीडीएमबीए’च्या तिघांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड