July 22, 2024

श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रत्नागिरी जेट्स वि. कोल्हापूर टस्कर्स यांच्यात रंगणार अंतिम सामना

पुणे, २८ जुन २०२३: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत क्वालिफायर २ लढतीत अक्षय दरेकर(३-२९) याने केलेल्या भेदक गोलंदाजीसह सिद्धार्थ म्हात्रे( नाबाद ५८ धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने पुणेरी बाप्पा संघाचा ५ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
 
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून पुणेरी बाप्पा संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले.

कोल्हापूरच्या आक्रमक गोलंदाजीपुढे पुणेरी बाप्पा संघाची वरची फळी सपशेल अयशस्वी ठरली. पुण्याचा सलामवीर पवन शहा ५ धावांवर कोल्हापूरच्या आत्मन पोरेने पायचीत बाद केले व पुण्याला पहिला धक्का दिला. शुभम तैस्वाल १४ चेंडूत १८ धावा करून तंबूत परतला. कोल्हापूरच्या निहाल तुसमदने त्याला झेल बाद केले. त्याने तीन चौकार मारले. त्यानंतर कर्णधार रोहन दामले(९धावा), यश क्षीरसागर(६धावा) यांना तरणजीत ढिलोनने त्रिफळा बाद करून पुणेरी बाप्पा संघाला अडचणीत टाकले. कोल्हापूरचा फिरकीपटू अक्षय दरेकर(३-२९)च्या भेदक गोलंदाजीपुढे मधल्या फळीतील फलंदाज हर्ष सांघवी(१७धावा), अद्वैय शिधये(४धावा), अजय बोरुडे(०धाव) हे देखील झटपट बाद झाले. त्यामुळे पुणेरी बाप्पा संघ १४ षटकात ७बाद ६८अशा बिकट स्थितीत सापडला.

नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या अभिमन्यु जाधवने चौफेर फटकेबाजी करत २१ चेंडूत नाबाद ४२ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. अभिमन्युने ३ चौकार व ३ षटकार मारले. त्याला सुरज शिंदेने २१ चेंडूत २६ धावांची खेळी करून साथ दिली. या जोडीने आठव्या विकेटसाठी ३६ चेंडूत ६५ धावांची भागीदारी करून संघाला निर्धारित षटकात ७बाद १३३ धावांचे आव्हान उभे करून दिले. कोल्हापूरकडून  अक्षय दरेकर ३-२९, तरणजीत ढिलोन(२-२०), आत्मन पोरे(१-८), निहाल तुसमद १-१३)यांनी सुरेख गोलंदाजी केली. 

१३४ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या कोल्हापूर टस्कर्स संघाने हे आव्हान १७.४ षटकात ५बाद १३४ धावा काढून पूर्ण केले. कोल्हापूरच्या केदार जाधव(५धावा)ला पुण्याच्या सचिन भोसलेने पायचीत बाद करून पहिला झटका दिला. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या अंकित बावणे(५धावा), किर्तीराज वाडेकर(०धाव) यांना सचिन भोसले झटपट बाद करून कोल्हापूर टस्कर्सला अडचणीत टाकले. त्यानंतर सिद्धार्थ म्हात्रेने ४१ चेंडूत ५८धावा करून अर्धशतक पूर्ण केले. त्यात त्याने ६ चौकार व २षटकार मारले. एकाबाजूने विकेट पडत असताना सिद्धार्थने आक्रमक फलंदाजी कायम ठेवत धावफलक हालता ठेवला. सिद्धार्थला नौशाद शेखने २४ धावा काढून साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी ३४ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केली. नौशाद शेख रोहन दामलेच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. सिद्धार्थने तरणजीत ढिलोनच्या साथीत २९ चेंडूत २३ धावांची भागीदारी करून धावगतीला वेग दिला. तरणजीत १० धावांवर बाद झाला. 

 
सिद्धार्थ म्हात्रे व साहिल औताडे(नाबाद २४धावा) या जोडीने २७ चेंडूत ५३ धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला. सिद्धार्थ म्हात्रेने विजयी षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

निकाल:
पुणेरी बाप्पा: २० षटकात ७बाद १३३धावा (अभिमन्यू जाधव नाबाद ४२(२१,३x४,३x६), सुरज शिंदे नाबाद २६(२१,१x६), हर्ष सांघवी १७, शुभम तैस्वाल १८, अक्षय दरेकर ३-२९, तरणजीत ढिलोन २-२०, आत्मन पोरे १-८, निहाल तुसमद १-१३) पराभुत वि.कोल्हापूर टस्कर्स: १७.४ षटकात ५बाद १३४ धावा (सिद्धार्थ म्हात्रे नाबाद ५८(४१,६x४,२x६), साहिल औताडे नाबाद २४(१४,२x४,१x६), नौशाद शेख २४(२३,१x४), सचिन भोसले ३-३३, रोहन दामले १-१७, अजय बोरुडे १-३७); सामनावीर – सिद्धार्थ म्हात्रे; कोल्हापूर टस्कर्स संघ ५ गडी राखून विजयी.