July 27, 2024

महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाची विजयाची हॅट्रिक

पुणे, ५ जून २०२४: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत चौथ्या दिवशी पहिल्या लढतीत अझीम काझी(५२धावा), धीरज फटांगरे(५०धावा) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने छत्रपती संभाजी किंग्स संघाचा ५ गडी राखून पराभव करून विजयाची हॅट्रिक साजरी केली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना छत्रपती संभाजी किंग्स संघाने २० षटकात ९बाद १८८धावाचे आव्हान उभे केले. सलामीचे फलंदाज सौरभ नवले(१), मुर्तझा ट्रंकवाला(५) हे फलंदाज झटपट बाद केले. रत्नागिरीच्या दिव्यांग हिंगणेकरने आपल्या पहिल्याच षटकात दोन्ही सलामीवीरांना झेल बाद करून छत्रपती संभाजी किंग्सला अडचणीत टाकले. १.४ षटकात २बाद ८ धावा असा संघ अडचणीत असताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या ओमकार खाटपेने धडाकेबाज फलंदाजी करताना ४२चेंडूत ६८धावा केल्या. यात त्याने ६चौकार व ४उत्तुंग षटकार खेचले. त्याला दिग्विजय पाटीलने ४४चेंडूत ४चौकार व ३षटकारासह ५६धावांची खेळी करून साथ दिली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी ७७ चेंडूत १०८ धावांची भागीदारी करून संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. एमपीएलमधील या मौसमातील हि पहिली शतकी भागीदारी ठरली.

ओमकारची झंझावती खेळी निकित धुमाळने १४व्या षटकात झले बाद करून संपुष्टात आणली. पाठोपाठ ओम भोसले(०)ला त्रिफळा बाद करून संघाला चौथा झटका दिला. मात्र, त्यानंतर रत्नागिरीच्या गोलंदाजांनी छत्रपती संभाजी किंग्सच्या फलंदाजांना झटपट तंबूत परत पाठवले. सौरभ सिंग(२४धावा), शामसुजमा काझी(नाबाद १४), राजवर्धन हंगरगेकर(१३धावा) यांनी थोडासा प्रतिकार केला. रत्नागिरी जेट्सकडून निकित धुमाळने ४७ धावात ३ गडी, प्रदीप दाढे(२-१८), दिव्यांग हिंगणेकर(२-३१) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

१८८धावांचे आव्हान रत्नागिरी जेट्स संघाने १८.५ षटकात ५बाद १९०धावा करून पूर्ण केले. सलामवीर क्रिश शहापूरकर(७धावा), प्रीतम पाटील(४धावा)हे झटपट तंबूत परतले. आनंद ठेंगे व राजवर्धन हंगरगेकर यांनी झेल बाद केले. धीरज फटांगरेने एकाबाजूने आक्रमक खेळी सुरु ठेवत २३ चेंडूत ५० धावा चोपल्या. यात त्याने ८चौकार व २ षटकारांची आतषबाजी केली. कर्णधार अझीम काझीने ४० चेंडूत ७चौकारांसह ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १९ चेंडूत ५१ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. याचवेळी शामसुझमा काझीने धीरज फटांगरेला झेल बाद करून त्याचा अडसर दूर केला. पण कर्णधार अझीम काझीने दिव्यांग हिंगणेकर(२८धावा)च्या साथीत चौथ्या गड्यासाठी ४१ चेंडूत ५३ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. त्यानंतर निखिल नाईक नाबाद २४, अभिषेक पवार नाबाद १६ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक:
छत्रपती संभाजी किंग्स: २० षटकात ९बाद १८८धावा(ओमकार खाटपे ६८(४२,६x४,४x६), दिग्विजय पाटील ५६(४४,४x४,३x६), सौरभ सिंग २४, शामसुजमा काझी नाबाद १४, राजवर्धन हंगरगेकर १३, निकित धुमाळ ३-४७, प्रदीप दाढे २-१८, दिव्यांग हिंगणेकर २-३१) पराभुत वि.रत्नागिरी जेट्स:१८.५ षटकात ५बाद १९०धावा(अझीम काझी ५२(४०,७x४), धीरज फटांगरे ५०(२३,८x४,२x६), दिव्यांग हिंगणेकर २८, निखिल नाईक नाबाद २४, अभिषेक पवार नाबाद १६,राजवर्धन हंगरगेकर २-४९, आनंद ठेंगे १-२३, शामसुझमा काझी १-१८, हितेश वाळुंज १-५०); सामनावीर – धीरज फटांगरे.