July 27, 2024

महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाची आगेकूच कायम

पुणे, ५ जून २०२४: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत चौथ्या दिवशी दुसऱ्या लढतीत मंदार भंडारी(४८धावा),अर्शिन कुलकर्णी(३१धावा), अथर्व काळे(नाबाद ४२धावा) यांनी केलेल्या छोट्या पण महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला. कोल्हापूर टस्कर्स संघाचा हा तिसरा पराभव असून आगामी लढतीत रायगड रॉयल्स संघाशी त्यांचा सामना असणार आहे.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाने २० षटकात ७बाद १६२धावा केल्या. कर्णधार राहुल त्रिपाठी(१२), अंकित बावणे(१), हर्ष संघवी(१२) हे वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे कोल्हापूर संघाची सुरवात फारशी चांगली झाली नाही. त्यानंतर सचिन धसने ३७चेंडूत ३चौकार व २षटकारासह ४६धावांची संयमी खेळी केली. त्याला अनिकेत पोरवालने ३०चेंडूत ३२चौकारांसह ३७धावा करून साथ दिली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५० चेंडूत ५८ धावांची भागीदारी करून संघाची धावगती वाढवली. सचिन धसने अनिकेत पोरवालला त्रिफळा बाद तर सचिन धसला झेल बाद करून कोल्हापूर संघाला अडचणीत टाकले. त्यानंतर सिद्धार्थ म्हात्रे(२३धावा), योगेश डोंगरे(११धावा) यांनी धावा काढून संघाला १६२ धावांचे आव्हान उभे करून दिले. ईगल नाशिक टायटन्सकडून मुकेश चौधरी(२-२५), अर्शिन कुलकर्णी(२-४९), हरी सावंत(२-१६), दिग्विजय देशमुख(१-१३) यांनी अचूक गोलंदाजी केली.

या आव्हानाचा पाठलाग करताना ईगल नाशिक टायटन्स संघाने १७.३ षटकात २ बाद १६३धावा करून पूर्ण केले. सलामीची जोडी मंदार भंडारी व अर्शिन कुलकर्णी यांनी आक्रमक खेळी करत कोल्हापुरच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. या जोडीने या मौसमातील आतापर्यंतची पॉवरप्लेमधील ३९चेंडूत ८२ धावांची सर्वोच्च भागीदारी केली. मंदार भंडारीने २८चेंडूत ४८धावा फटकावल्या. यात ६चौकार व २ षटकार खेचले. तर, अर्शिनने १४चेंडूत २चौकार व ३ षटकारासह ३१धावा काढून साथ दिली. मंदार भंडारीला श्रेयस चव्हाणने त्रिफळा बाद केले, तर अर्शिन कुलकर्णीला श्रीकांत मुंढेने पायचीत बाद केले. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर अथर्व काळेने ३२चेंडूत ४ षटकाराच्या मदतीने नाबाद ४२ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याला रणजित निकमने ३१चेंडूत २चौकार व १ षटकारासह नाबाद ३२धावा काढून साथ दिली. रणजीत निकम व अथर्व काळे या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ६१ चेंडूत ७९ धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला.

संक्षिप्त धावफलक:
पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स: २० षटकात ७बाद १६२धावा(सचिन धस ४६(३७,३x४,२x६), अनिकेत पोरवाल ३७(३०,३x४), सिद्धार्थ म्हात्रे २३, राहुल त्रिपाठी १२, हर्ष संघवी १२, योगेश डोंगरे ११, मुकेश चौधरी २-२५, अर्शिन कुलकर्णी २-४९, हरी सावंत २-१६, दिग्विजय देशमुख १-१३) पराभुत वि.ईगल नाशिक टायटन्स: १७.३ षटकात २ बाद १६३धावा(मंदार भंडारी ४८(२८,६x४,२x६), अर्शिन कुलकर्णी ३१(१४,२x४,३x६), अथर्व काळे नाबाद ४२(३२,४x४), रणजीत निकम नाबाद ३२(३१,२x४,१x६), श्रीकांत मुंढे १-१७, श्रेयस चव्हाण १-२०); सामनावीर – मंदार भंडारी.

आजचे सामने
६ जून ४एस पुणेरी बाप्पा वि. रायगड रॉयल्स दु. २ वा
६ जून ईगल नाशिक टायटन्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज सायं. ७ वा