July 24, 2024

श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाला विजेतेपद


पुणे, २८ जुन २०२३: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम लढतीत सततच्या पावसामुळे राखीव दिवशी सुद्धा पूर्ण खेळ होऊ शकला नाही. परंतु गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या रत्नागिरी जेट्स संघाने ८ गुणांसह(नेट रनरेट +०.६३०)च्या जोरावर विजेतेपद संपादन केले.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर पार पडलेल्या या स्पर्धेत काल पावसामुळे अंतिम सामन्याचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे आज सकाळी सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून कोल्हापूर टस्कर्स संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. 

 
कोल्हापूरचे आघाडीचे फलदांज अंकित बावणे (१धाव), साहिल औताडे (५धावा) हे स्वस्तात बाद झाले. रत्नागिरीचा डावखुरा फिरकीपटू कुणाल थोरातने या दोघांना बाद करून कोल्हापूर संघाला ३.२ षटकात २ बाद १२ धावा असे अडचणीत टाकले. कोल्हापूर संघ ७ षटकात २ बाद ४३ धावा असताना पाऊस पुन्हा सुरु झाला. एकाबाजूने केदार जाधवने संघाची धुरा सांभाळली असताना मात्र दुसऱ्या बाजूने नौशाद शेख(१२धावा), सिद्धार्थ म्हात्रे (०), अक्षय दरेकर (४धावा) हे झटपट बाद झाले. त्यामुळे कोल्हापूर संघ १०.२ षटकात ५बाद ५७ धावा अशा स्थितीत होता. 
 
केदार जाधव २८  चेंडूत २ चौकार व २ षटकारासह ३२ धावांवर असताना रत्नागिरीच्या  विजय पावलेने त्याला त्रिफळा बाद करून अडसर दूर केला. त्यानंतरही कोल्हापूर संघाची विकेट गळती सुरूच राहिली. निखिल मदास (८धावा), मनोज यादव (२धावा) हे देखील एकेरी धावसंख्येवर बाद झाले. रत्नागिरी जेट्स संघाकडून प्रदीप दाढे (३-२४), कुणाल थोरात (२-२२), निकित धुमाळ (२-१२), विजय पावले (१-८) यांनी सुरेख गोलंदाजी केली. कोल्हापूर संघ १६ षटकात ८बाद ८० धावा असताना पुन्हा पाऊस सुरु झाला. सतत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही व रत्नागिरी जेट्स संघाने विजेतेपद पटकविले.     
 
स्पर्धेतील विजेत्या रत्नागिरी जेट्स संघाला करंडक व 50लाख रुपये, तर उपविजेत्या कोल्हापूर टस्कर्स संघाला करंडक व 25लाख रूपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमसीएचे उपाध्यक्ष किरण सामंत,एमपीएलचे चेअरमन सचिन मुळ्ये, सचिव शुभेंद्र भांडारकर, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज आणि जान्हवी धारिवाल बालन, रत्नागिरी संघाचे मालक राकेश व राजन नवानी यांच्या हस्ते करण्यात आले. 
 
यावेळी एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी सर्व संघ मालक, खेळाडू, एमसीए अपेक्स सदस्य, ग्राउंड स्टाफ, सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. 
 
यावेळी एमसीएमधील इतर पदाधिकारी सुहास पटवर्धन, सुनील मुथा, विनायक द्रविड, केशव वझे राजू काणे, ॲडव्होकेट अजय देशमुख, राजवर्धन कदमबांडे, अतूल जैन, ॲडव्होकेट कमलेश पिसाळ, सुशील शेवाळे, रणजीत खिरिड, कल्पना तापिकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
निकाल: 
कोल्हापूर टस्कर्स:१६ षटकात ८बाद ८० धावा(केदार जाधव ३२(२८,२x४,२x६), नौशाद शेख १२, तरणजीत ढिलोन १०, प्रदीप दाढे ३-२४, कुणाल थोरात २-२२, निकित धुमाळ २-१२, विजय पावले १-८ वि.रत्नागिरी जेट्स: .     
0
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: अंकित बावणे(३६३ धावा); 
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: सचिन भोसले(१४ विकेट).