September 4, 2026

जनरल मनोज नरवणे यांच्या ‘द क्युरिअस अँड द क्लासिफाइड’ पुस्तकाचे पुण्यात दिमाखात प्रकाशन

पुणे, 20/8/2026: देशाचे २८ वे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘द क्युरिअस अँड द क्लासिफाइड – अनअर्थिंग मिलिट्री मिथ्स अँड मिस्ट्रीज’ या नव्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा गुरुवारी (दि २० ऑगस्ट) पुण्यात उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम केवळ एका पुस्तकाचे प्रकाशन न राहता, लष्करी जीवनातील पडद्यामागचे सत्य उलगडणारे एक वैचारिक व्यासपीठ ठरले.

या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी सर्व पुणेकरांच्या वतीने केले होते. या संभाषणात लष्करातील दंतकथा, रेजिमेंटल परंपरा, अनुत्तरीत राहिलेली रहस्ये आणि सैनिकांच्या जीवनातील मानवी पैलू यावर अत्यंत मोकळेपणाने चर्चा झाली.

कार्यक्रमादरम्यान जनरल नरवणे यांनी सैन्याविषयीच्या अनेक गैरसमजुती दूर करतानाच, युद्धाच्या वास्तवावर प्रकाश टाकला. युद्ध हे केवळ सीमांवर लढले जात नाही, तर त्याचा किती मोठा मानसिक ताण सैनिक, त्यांचे कुटुंबे आणि संपूर्ण समाजावर पडतो, या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले. गणवेशामागील संघर्ष, युद्धाची किंमत आणि सैनिकांचे खडतर जीवन यावर त्यांनी मांडलेली मते उपस्थितांना विचार करायला लावणारी होती.

केवळ युद्ध आणि सैनिकी रहस्यांपुरता हा सोहळा मर्यादित नव्हता, तर समकालीन भारताच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांनाही यादरम्यान स्पर्श करण्यात आला. ‘अनेकता मे एकता’ ही केवळ घोषणा किंवा कागदावरची घोषणा राहू नये, तर ती प्रत्येक नागरिकाने आपल्या जगण्यात उतरवली पाहिजे, असा मोलाचा संदेश जनरल नरवणे यांनी दिला. देशातील सर्व घटकांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मता प्रत्यक्षात कशी जगली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

या आयोजनाविषयी बोलताना प्रफुल्ल सारडा म्हणाले, “हा सोहळा केवळ एका पुस्तकाचे प्रकाशन नव्हे, तर रणांगणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावणारे एक व्यासपीठ होते. गणवेशामागील गोष्टी, लष्करी लोककथांमागील सत्य आणि युद्धाची खरी वास्तवता यावर झालेली ही एक अत्यंत पारदर्शक व unfiltered चर्चा होती. पुणेकरांनी या कार्यक्रमाला दिलेला प्रतिसाद आणि दाखवलेली उत्सुकता अत्यंत वाखाणण्याजोगी होती.”

‘द क्युरिअस अँड द क्लासिफाइड’ हे पुस्तक वाचकांना लष्कराविषयीच्या पारंपारिक आणि ठरवून दिलेल्या चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार करण्यास प्रवृत्त करते. सैन्याबद्दलची जिज्ञासा, त्यातील दंतकथा आणि सैनिकांचे खरेखुरे आयुष्य जवळून अनुभवण्याची संधी या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे पुणेकरांना सैनिकी जीवनातील एका नव्या आणि प्रेरणादायी पैलूची ओळख झाली असून, संपूर्ण शहरात या प्रकाशन सोहळ्याचीच चर्चा रंगली आहे.