December 14, 2024

शरद पवारांच्या व्यंगावर बोलल्याने अजित पवार भडकले, सदाभाऊ खोतांना दिला इशारा

पुणे, ६ नोव्हेंबर २०२४: रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष व महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी जत येथील सभेमध्ये शरद पवारांच्या चेहऱ्यावरून वादग्रस्त टीका केली. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून मिळाले निघालेले आहे. सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यामुळे महायुतीची कोंडी झालेली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र सदाभाऊ खोत यांना सडेतोड उत्तर दिले. यापुढे शरद पवार यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

शरद पवार यांच्या चिल्या पिल्लांनी बँका, सूतगिरण्या, कारखाने सगळं लुटले तरी आता यांना महाराष्ट्र घडवायचा आहे असं म्हणतात. शरद पवार यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का असा वादग्रस्त प्रश्न सदाभाऊ खोत यांनी केला. त्यामुळे विरोधी पक्षाकडून सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध करताना भाजप सह अजित पवारांना कोंडीत पकडले आहे. शरद पवार यांना कॅन्सर झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यामध्ये बदल झालेला आहे त्यावरून ही टीका वादग्रस्त बनली आहे.

अजित पवार यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असा इशारा अजित पवारांनी दिला.

तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल बोलताना लाज कशी वाटली नाही. चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्यामुळं त्यांचा जबडा काढण्यात आला. ऑपरेशननंतर काहीच दिवसांनी रक्तस्त्राव होत असतानाही ते उपस्थित राहिले. त्यामुळं आपण काय बोलतोय याची काही समज नाही का आपल्याला. महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही, शरद पवारांचा शंभर टक्के वाटा आहे . त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना बोळणं यावरून तुमची अक्कल शुन्यता लक्षात येते, अशी टीका आव्हाडांनी केली.