July 8, 2025

पुण्यात कचऱ्याच्या वाढत्या समस्येवरून नागरिक संतप्त

काजल भुकन
पुणे, २४ मे २०२५: पुण्यातील कर्वेनगर, पाषाण आणि खराडी परिसरातील नागरिक कचऱ्याच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या अनियमित सेवा, रस्त्यांवर साचलेला कचरा, आणि त्याभोवती फिरणारे भटके कुत्रे यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी वेळेवर कचरा संकलन, स्वतंत्र कचराकुंड्या आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

“महापालिकेची गाडी नियमित येत नाही. त्यामुळे आम्हाला खाजगी एजन्सीकडून कचरा उचलून घ्यावा लागतो. यासाठी दरमहा ₹७००–८०० खर्च येतो. अनेकांना हे परवडत नाही. काहीजण तर बसस्थानकाजवळच कचरा टाकतात,” अशी संतप्त प्रतिक्रिया कर्वेनगरमधील रहिवासी गणेश व्यास यांनी दिली.

पाषाणमधील रहिवासी आणि पीजी व्यवस्थापक अमर राज यांनी सांगितलं, “दररोज कचरा उचलणं आवश्यक आहे. पण महापालिकेच्या वेळा अनियमित आहेत. त्यामुळे आम्ही खाजगी पर्यायांकडे वळतो.”

विद्यार्थ्यांनाही या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असून, सोनाली तिवारी म्हणतात, “मी रोज कर्वेनगर बसस्थानकाजवळून एफसी रोडकडे जाते. तिथं मोठ्या प्रमाणात कचरा खुल्यात टाकलेला असतो. दुर्गंधी आणि कुत्र्यांचा त्रासही होतो.”

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ अंतर्गत डिसेंबरमध्ये मेगा मोहीम राबवली होती. १८ नवीन वाहने समाविष्ट करण्यात आली. तरीही नागरिकांच्या मते, ही व्यवस्था अपुरी आणि दिशाहीन आहे.

नागरिक मंचचे विवेक वेलणकर सरजग म्हणाले, “ओला-सुका कचरा वेगळा करणं महत्त्वाचं आहे. पण महापालिका आणि नागरिक दोघेही यात कमी पडत आहेत. कर्वेनगरसारख्या भागात किमान सेवा देण्यात महापालिका अपयशी ठरत आहे.”

खराडी बायपास रोड व उबळेनगर बसस्थानक परिसरातही कचऱ्याची समस्या गंभीर आहे. “लोक ₹८० फी भरत नाहीत. थेट रस्त्यावर कचरा फेकतात,” असं स्थानिकांचं म्हणणं आहे. रोज प्रवास करणारे विशाल राऊत म्हणाले, “कचऱ्याचा वास सहन होत नाही. यामुळे वाहतूकही विस्कळीत होते. टाक्यांची सोय असती असे होणे टळले असते.”

कॉलेज विद्यार्थिनी अर्चना भुजबळ म्हणाल्या, “लोक सर्रास रस्त्यावर कचरा फेकतात. ही आरोग्यासाठी गंभीर बाब आहे. महापालिकेने या वर तातडीने कारवाई केली पाहिजे.”

SWaCH सहकारी मंडळ सुमारे ४,०००–४,५०० कचरावेचकांच्या माध्यमातून दर फ्लॅटला ₹८५ दराने सेवा पुरवते. मात्र महापालिकेची अधिकृत ₹८० सेवा बऱ्याच नागरिकांना माहितीच नाही किंवा ते पैसे द्यायला तयार नसतात.

महापालिकेच्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याने सांगितलं, “लोक आमच्यासमोरच कचरा टाकतात. विरोध केला की उद्धटपणे वागतात. वर्गीकरण अशक्य होतं कारण घरगुती कचरा, प्लास्टिक, मृत प्राणी एकत्र काचऱ्यामधे टाकलेले असतात. महापालिकेने अधिक कडक पावलं उचलायला हवीत.”

नगरिकांनी महापालिकेकडे नियमित सेवा, जनजागृती मोहीम आणि अवैध कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

महापालिकेचे उपआयुक्त संदीप कदम म्हणाले, “कर्वेनगरमधील तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या नाहीत. मी संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांना सूचित करेन.” खराडीतील समस्यांबाबत त्यांनी तपास करून या बद्दल अपडेट देण्याचे आश्वासन दिलं.