पुणे, दि. ३१/१०/२०२४: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअर्स, मॅग्नीफाईंग ग्लास, रॅम्प, वाहन व्यवस्था, स्वयंसेवकाची नेमणूक आदी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती देऊन जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र सुसूत्रीकरणानंतर ३ हजार २२५ मतदान केंद्रांची ठिकाणे आणि एकूण ८ हजार ४६२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. ‘इआरओ नेट’ सॉफ्टवेअरमध्ये दिव्यांग प्रवर्गनिहाय अस्थिव्यंग २२ हजार २३९, कर्णबधिर ३ हजार ८६४, अंध किंवा अल्पदृष्टी ७ हजार ९१९ व अन्य ५६ हजार ११२ असे एकूण ९० हजार १३४ दिव्यांग मतदार आहेत.
मतदारसंघनिहाय सर्वेक्षण करुन मतदार यादी भागनिहाय दिव्यांग मतदारांचे ध्वजांकन (फ्लॅगिंग) आणि स्थानांकन (मॅपिंग) करण्यात आले आहेत. जिल्हा दिव्यांग कक्षासाठी जिल्हा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी यांची समन्वय अधिकारी तसेच सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून ५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय दिव्यांग कक्षासाठी समन्वयक म्हणून २१ व जिल्हा दिव्यांग कक्षासाठी १ असे एकूण २२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ आणि समावेशक निवडणूक प्रक्रियेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील या उपाययोजनांचे निरीक्षण आणि मूल्यमापन करण्यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली सुलभ निवडणुकांबाबत जिल्हा आदर्श समिती (डिस्ट्रिक्ट मॉडेल कमिटी ऑन ॲक्सेसीबल इलेक्शन- डीएमसीएई) तसेच निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा मतदार संघनिहाय समिती (एसीसीएई) समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.
दिव्यांग मतदारांकरिता सोयी-सुविधा
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरिकांसाठी जिल्ह्यात ४ हजार १३६ व्हील चेअर्स, ८ हजार ४६२ मॅग्नीफाईंग ग्लास तसेच मदतीसाठी ५ हजार ९६३ स्वंयसेवक उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाईड आदींच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे.
सर्व मतदान केंद्रांवर अडथळा विरहित वातारण, रॅम्पची सुविधा, तळ मजल्यावर मतदान केंद्र, दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रावर येण्या-जाण्यासाठी वाहन व्यवस्था, स्वतंत्र रांग, दिशादर्शक फलक, प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, वाहनतळ, प्रथमोपचार पेटी, मदत कक्ष, ब्रेल लिपीतील साहित्य, कर्णबधिर दिव्यांगांसाठी दुभाषक, फॉर्म १२ ड भरुन घरातूनच मतदानाची सोय, ९२२६३६३००२ हा हेल्पलाईन क्रमांक आदी सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सक्षम ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांच्या मागणीप्रमाणे मतदारसंघनिहाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
दिव्यांगांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने २३ दिव्यांग आयकॉनची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याद्वारे जाहिरातीद्वारे, त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मतदार जागृती करण्यात येणार आहे.
दिव्यांग मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन:
जिल्ह्यात मतदार नाव नोंदणीचे ४८ कार्यक्रम घेण्यात आले असून कार्यक्रमामध्ये २४२ दिव्यांग मतदारांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. २० सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जिल्ह्यामध्ये दिव्यांग मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत ७३ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याअंतर्गत मतदान शपथ वाचन, दिव्यांग मतदार व विद्यार्थीं रॅली, पथनाट्य, रांगोळी, चित्रकला स्पर्धा, दिव्यांग मुलांकडून प्रचार व प्रसार, विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्याबाबत संकल्प भरुन घेणे असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा विधानसभा सार्वत्रिक निवडणूकअंतर्गत दिव्यांग कक्षाचे समन्वय अधिकारी राधाकिसन देवढे यांनी दिली आहे.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.