December 14, 2024

उद्योग विभागांतर्गतच्या आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्याचे निर्देश

पुणे, दि. ३०/१०/२०२४: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी आपल्या अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी, असे निर्देश उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने परिपत्रकाद्वारे जारी केले आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल.

ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. मतदानासाठी मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

ज्यांच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या रोजगारामध्ये गुंतला आहे त्या रोजगाराच्या संदर्भात धोका किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते अशा मतदाराच्या बाबतीत ही सुट्टीची तरतूद लागू राहणार नाही.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील अथवा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.