May 20, 2024

ईएमएमटीसी – एमएसएलटीए 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेस आजपासून प्रारंभ

औंरंगाबाद, दि 27 ऑक्टोबर 2023: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देशभरातून मुले व मुली दोन्ही गटात 120 हुन अधिक  स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे  28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2023 या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या पार्थसारथी मुंढेला, तर मुलांच्या गटात कर्नाटकच्या हृतिक कटकमला अव्वल मानांकन देण्यात आले आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, एम एस एलटीए च्या वतीने 16वर्षाखालील गटात पहिल्यांदाच आशियाई मानांकन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची आणखी संधी मिळेल.
 “मराठवाड्यात अधिकधिक टेनिस कोर्ट, प्रशिक्षक, खेळाडूंमध्ये टेनिसचा होत असलेला प्रसार बघुन आम्हांला खूप आनंद झाला आहे”. औरंगाबाद येथे नुकतीच 14 वर्षाखालील गटातील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. एकापाठोपाठ आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धांमुळे औरंगाबाद मधील खेळाडूंना महत्वपूर्ण गुण मिळवण्याची संधी मिळणार असल्याचे अय्यर यांनी सांगितले.
 वर्षा जैन आणि अनुरंग जैन यांनी टेनिस उपक्रमांना दिलेल्या अतुलनीय पठिंब्याबद्दल तसेच, औरंगाबादमध्येच नव्हे तर बीड, परभणी, नांदेड आणि जालना या ठिकाणीही या खेळाच्या प्रचारासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे अय्यर यांनी नमूद केले.
याशिवाय मुलांचा मुख्य ड्रॉ 64 चा असेल तर,  मुलींचा मुख्य ड्रॉ 48 चा असणार आहे. पात्रता फेरीचे सामने शनिवार, 28 व रविवार, 29 ऑक्टोबर रोजी तर सोमवारी, 30 ऑक्टोबरपासून मुख्य फेरीच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व 300 एटीएफ गुण तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 250 एटीएफ गुण देण्यात येणार आहेत.
स्पर्धा संचालक वर्षा जैन असणार असून या स्पर्धेसाठी सेजल केनिया यांची एआयटीए सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे., प्रवीण प्रसाद आणि प्रविण गायसमुद्रे यांची या स्पर्धेसाठी मुख्य रेफ्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये संजय दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली आणि एमएसएलटीए कौन्सिल सदस्य अली पंजवानी आणि आशुतोष मिश्रा  यांचा समावेश आहे.