April 27, 2025

बीडमधील वाढती गुन्हेगारी ही सत्तेच्या गैरवापराचा दुष्परिणाम ः शरद पवारांनी व्यक्त केले मत

पुणे, १५ मार्च २०२५ ः बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा अद्याप सुरू असतानाच, बीड मधील गुन्हेगारी बाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे समोर येत असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील चिंतेची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेली अनेक वर्षे बीड मधील परिस्थिती पाहत आहे, पण जी परिस्थिती आता आहे ती आधी नव्हती, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच पत्राकार परिषद पार पडली, त्यावेळी त्यांनी बीड बाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “बीड हा सर्वांना एकत्र घेऊन जाणारा जिल्हा असून मी स्वतः त्या भागावर लक्ष देत होतो. त्या ठिकाणी सहा सहा सदस्य निवडून आणले एक प्रकारे सामंजस्याचे वातावरण होते. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचे दुष्परिणाम गेल्या काही महिन्यात बीडमध्ये आपल्याला दिसत आहेत. राज्य सरकारने जो कायदा हातात घेईल त्यांच्या विरोधात सक्त कारवाई करावी. तसेच या संदर्भात धोरण आखण्याची गरज आहे.”

राज्य सरकारने मराठवाडा आणि विदर्भातील २७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली असून याबाबत पवार यांना सांगितले की, “मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे आहेत, ज्यांची माहिती मिळत आहे ती चिंताजनक आहे. आम्ही विविध भागांतील परिस्थितीची माहिती गोळा करत आहोत आणि केंद्र सरकारने याबाबत धोरण आखावा आणि केंद्राने काही निधी ठरवावे असे आग्रह आम्ही करणार आहोत. तसेच याबाबत सातत्याने लक्ष केंद्रित करणार आहोत.”

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदू मुस्लिम वाद असतील तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचंबाबत विविध लोकांकडून होणारे अपमान याबाबत पवार म्हणाले, “राज्यातील काही ठिकाणी परिस्थिती बिघडली असून त्याचा गैरफायदा घेणारे जे घटक आहेत, अशा घटकांबाबत राज्य सरकारने ठोस पावे उचलावीत. तसेच सत्तेचे गैरवापर आणि समाजामध्ये जात व धर्माबाबत अशांतता निर्माण करणाऱ्यांविरोधात राज्यसरकारणे केवळ बघत राहण्याची भूमिका घेऊ नये.”

कृत्रिम बुद्धिमत्ता बाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की शंभर टक्के ही एक क्रांती आहे…
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून आमचे लक्ष शेती आहे. उसाचे उत्पादन वाढीसाठी व उसामधील गुलकोटचे प्रमाण वाढवून उसाचा दर्जा हे सर्व एआयच्या माध्यमातून होऊ शकते. या उपक्रमात दक्षिण महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने सहभागी होतील अशी इच्छा आहे. यासाठी एक बैठक होणार असून त्यात ३०० हून अधिक जण सहभाग घेतील. त्यामध्ये विविध संशोधन त्यांच्या समोर मांडले जातील. ज्यामुळे हा क्रांतिकारक निर्णय महाराष्ट्रमध्ये सुरू होईल.