December 2, 2023

पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष विश्वजित कदम यांचा विश्वास

पुणे १8 सप्टेंबर २०२३ ः पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेसाठी काम करताना अनेकदा हक्काच्या मैदानासाठी प्रयत्न केले. यश येता येता राहिले. पण, आता नव्याने या *ढोबरवाडी* मैदानाचा ताबा मिळाला आहे. पुण्याच्या फुटबॉल विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि भविष्यात येथे चांगले मैदान उभे राहिल असा विश्वास पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांनी पुणेकरांना दिला.

पुणे महानगरपालिकेकडून मैदानाचा ताबा मिळाल्यानंतर शनिवारी विश्वजीत कदम, आमदार सुनिल कांबळे आणि माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले. त्या वेळी श्री कदम बोलत होते. पुण्याच्या खेळाडूंचे कौतुक करताना हक्काचे मैदान नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. काही तांत्रिक अडचणीतून या मैदानाचा विकास मागे राहिला असला, तरी आता पुन्हा एकदा मैदानाचा ताबा मिळाल्यानंतर या मैदानाचा चांगला विकास केला जाईल. खेळाडूंसाठी सर्व सुविधा येथे निर्माण केल्या जातील. पुणे महानगरपालिका आणि चाहत्यांनी मनावर घेतल्यास शहरातून चांगले फुटबॉलपटू मिळण्यास वेळ लागणार नाही, असेही कदम म्हणाले.

खेळामध्ये ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, त्याला प्रशिक्षण देण्याची गरज आहे. खेळात राजकारण नको असे नुसते म्हटले जाते. फुटबॉलच्या विकासासाठी जे काही करता येईल ते करण्याची गरज आहे. यासाठी या मैदानावर एक चांगले क्रीडा संकुल उभे करू असे आश्वासन आमदार सुनिल कांबळे यांनी दिले. चांगले खेळाडू कसे खेळतील आणि चांगले प्रशिक्षण कसे मिळेल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्याला आता मैदान मिळाले आहे. त्यांनी मैदानाचा विकास करावा. आम्ही हवी ती मदत देण्यास तयार आहोत, असेही सुनिल कांबळे यांनी सांगितले.

देशात क्रिकेटला दुर्दैवाने अति महत्व दिले गेले. कसोटी क्रिकेट होते तोवर ठिक होते. नंतर एकदिवसीय आले, मग टी २० आले. मग येथे नुसता पैशाचा पाऊस पडत आहे. पण, खरा खेळ असलेला फुटबॉल मागे पडत चालला आहे, अशी खंत दिलीप कांबळे यांनी व्यक्त केली. सराव नसताना मैदानावर येऊन वेळ घालवणांऱ्यावर वचक बसवू. मैदान नीट होण्यासाठी जी काही मदत लागेल ती देण्यासाठी तत्पर असू असा शब्दही दिलीप कांबळे यांनी या वेळी दिला.

कार्यक्रमासाठी स्थानिक नेत्यांसह अनेक उत्साही फुटबॉलपटू, पुणे जिल्हा संघटनेचे पदाधिकारी प्यारेलाल चौधरी, माजी मंत्री रमेश बागवे, नरगसेवकर उमेश गायकवाड, मंगला मंत्री आणि मॅथ्यू सुसेनाथन उपस्थित होते.