July 25, 2024

पुणे: महाविद्यालयाच्या परिसरातील पानपट्टीत गांजा विक्री, कर्वेनगरमध्ये परराज्यातील पानपट्टीचालक अटकेत

पुणे, ०९/०७/२०२३: कर्वेनगर भागातील एका महाविद्यालयाच्या परिसरात पानपट्टीत गांजा, तसेच भांगेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या पानपट्टीचालकास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

रामबाबू देवनारायण महातो (वय ३१, सध्या रा. कॅनोल रस्ता, कर्वेनगर, मूळ रा. रोहुवा, जि. सातावाडी, बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महातो याची कर्वेनगरमधील कॅनोल रस्ता परिसरात पानपट्टी आहे. या भागात महाविद्यालय असून, कॅनोल रस्ता परिसरात मोठ्या संख्येने परगावातील विद्यार्थी राहायला आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी पांडुरंग पवार, सचिन माळवे गस्त घालत होते. त्या वेळी महातो पानपट्टीत गांजा, तसेच भांगेच्या गोळ्यांची (बंटा) विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांच्या पथकाने महातोच्या पानपट्टीवर छापा टाकला. पानपट्टीतून ११० ग्रॅम गांजा, तीन किलो ५१५ ग्रॅम बंटा असा ४७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महातोविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदीप शिर्के, राहुल जोशी, सुजीत वाडेकर आदींनी ही कारवाई केली.