December 2, 2023

पुणे: कात्रज परिसरात वाहनांची तोडफोड, टोळक्याला अटक

पुणे, दि. १७/०७/२०२३: शहरात वाहन तोडफोडीचे सत्र कायम असून, जुन्या भांडणाच्या वादातून टोळक्याने कात्रज भागात दोन वेगवेगळ्या घटनेत सोसायटीच्या आवारातील आठ ते दहा वाहनांची तोडफोड केल्याची घटना १५ जुलैला रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

मधुकर उर्फ अप्पा ग्यानबा भिलारे (वय ४७), आकाश नानासाहेब गरवडे (वय २७), अमित उत्तम भिलारे (वय ३६), फिरोज हसन शेख (वय २४), मुस्तफा मेहबूब शेख (वय २१, सर्व रा. भिलारेवाडी, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भिमाजी भिकाजी सावंत (वय ३३, रा. ओमसाई निवास, भिलारेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सावंत यांचा आरोपींशी वाद झाला होता. त्याच रागातून आरोपी भिलारे, गरवडे, शेख हे ओम साई निवास सोसायटीच्या परिसरात आले. त्यांनी सावंतला शिवीगाळ करीत सोसायटीच्या आवारातील दोन मोटारी, रिक्षा, दुचाकी, टँकरवर दगडफेक केली. कोयते आणि बेसबॉल स्टीक उगारुन दहशत माजविली.

दुसर्‍या घटनेत टोळक्याने भिलारेवाडीत १५ जुलैला रात्री दहाच्या सुमारास हवेत शस्त्रे फिरवून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. सोसायटीतील पार्विंâगमधील वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी आकाश गरबडे वय २८ याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तळजाई परिसरातील वाहन तोडफोड घटना ताजी
सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत वैमनस्यातून टोळक्याने २६ वाहनांची तोडफोड केली होती. वारजे भागात वाहन तोडफोडीची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा कात्रज परिसरातील भिलारेवाडीत वाहन तोडफोडीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.