September 10, 2024

पुणे: चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला पेटवले, पत्नी गंभीर जखमी

पुणे, दि. २१/०९/२०२३: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मद्यपान केलेल्या पतीने पत्नीला शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर तिला पेटवून दिल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. लोणी काळभोर परिसरात वळती याठिकाणी घटना घडली आहे.

अक्षय मारुती कुंजीर आणि आशा मारुती कुंजीर (रा. लोणी काळभोर)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमता अक्षय कुंजीर (वय २३) हिने फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अक्षय आणि अमता यांचे काही महिन्यांपुर्वी लग्न झाले आहे. लग्नानंतर अक्षय हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. मद्यपान करुन तिला शिवीगाळ करून मारहाण करत होता. १२ सप्टेंबरला त्याने दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नीस बेदम मारहाण केली. दरवाजा बंद करून पत्नीला’ तू जीव दे ‘असे म्हणाला. त्यामुळे पत्नीने मारहाणीपासून वाचण्यासाठी आणि त्याला भीती दाखवण्यासाठी शेती पंपातील पेट्रोल अंगावर ओतून घेतले. त्याचवेळी अक्षयने पत्नीवर पेटती काडी फेकली आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नीच्या गळ्यात छातीला आणि तोंडास भाजून गंभीर जखमा झाल्या आहेत . सासूने या प्रकाराबाबत कोणाला काही सांगू नको असे म्हणून अमताला शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस खोसे तपास करत आहे.