April 27, 2024

पुणेकर आता फसणार नाहीत; जिंकणार आहेत – काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीचे स्वागत

पुणे, २२ मार्च २०२४: मागच्या दोन निवडणुकीत पुणेकरांनी ज्यांना बहुमत दिले त्यांनी पुणेकरांना फसवले. पुण्याचे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत. त्यामुळे पुणेकर आता फसणार नाहीत. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम धावून जाणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पुणेकर निवडून आणतील. माझा विजय हा तमाम पुणेकरांचा विजय असेल, अशी भावना काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केल्या.

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने केल्यानंतर गुरुवारी (ता. २१) रात्री आणि शुक्रवारी (ता. २२) सकाळी शहरात ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर झाल्याने ढोल ताशा वाजवत, फटाक्यांची आतषबाजी करीत, एकमेकाला पेढे भरवत नेते, कार्यकर्ते या आनंदात सहभागी झाले होते.

रवींद्र धंगेकर म्हणाले, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे आणि सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. याआधीच्या निवडणुकात मला पुणेकरांनी भरभरून आशीर्वाद दिला आहे. आता याही निवडणुकीत पुणेकर मला भरभरून आशीर्वाद देवून पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून मला लोकसभेत पाठवतील, असा मला विश्वास आहे.

भाजपचे नेते हे पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यामुळे रस्त्यावर फिरू लागले आहेत. पण, मी मागच्या तीस, पस्तीस वर्षापासून रस्त्यावरच आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घेत आहे. सोडवत आहे. लोकांच्या प्रश्नांच्या ठिकाणी मी कायम धावून जातो. माझे आजवरचे काम हाच माझा प्रचार आहे. तो आज नव्हे तर गेल्या तीस, पस्तीस वर्षापासून सुरूच आहे. हे काम पाहूनच पक्षाने मला आता लोकसभा लढण्याची संधी दिली आहे. माझा विजय निश्चित आहे. कारण मी पुणेकरांचा उमेदवार आहे. पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी लढणारा, संघर्ष करणारा मी कार्यकर्ता आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

…याची आम्हाला गॅरंटी आहे

ते पुढे म्हणाले, अस्ताव्यस्त वाहतुक, प्रदूषण, अमली पदार्थांचा वाढता विळखा, वाढती गुन्हेगारी… अशा अनेक समस्या पुणेकरांसमोर आहेत. महागाई, बेरोजगारी या समस्या तर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भाजपबद्दल कमालीचा असंतोष पसरलेला आहे. भाजपने या प्रश्नांबद्दल काहीही केले नाही. गेली १० वर्षे इथे भाजपचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी पुणेकरांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवला नाही. राज्यात आणि देशात भाजपच्या कारभाराला, फसवणुकीला जनता कंटाळली आहे. ती या निवडणुकीत काँग्रेसला बहुमताने निवडून आणून भाजपला जागा दाखवून देईल, याची आम्हाला गॅरंटी आहे.

“काँग्रेस पक्षात कसलीही गटबाजी नाही. कोणीही नाराज नाही. आम्ही सगळे लढणारे कार्यकर्ते आहोत. हातात हात घालून एकदिलाने आम्ही ही निवडणूक लढू आणि जिंकू. आम्हाला पुण्याचा विकास महत्त्वाचा आहे.” – रवींद्र धंगेकर