April 28, 2024

अतिरिक्त आयुक्त ढाकणेंच्या बदलीने शॉक

पुणे, २० मार्च २०२४ : पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे रखडलेले रस्ता रुंदीकरण वर्षानुवर्ष सुरू असलेला अतिक्रमणांचा वाद यामुळे अनेक महत्त्वाचे रस्त्यांवर बॉटल नेक तयार झालेला होता. नागरिकांशी संवाद साधून त्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देऊन, वेळप्रसंगी पोलिसांचा वापर करून रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचा धडाका लावलेल्या अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे पुणेकरांना शॉक बसला आहे.

विकास ढाकणे हे मूळचे रेल्वे पोलीस फोर्स मधील अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड, पुणे महापालिकेत अतिरिक्त पदी काम केल्यानंतर त्यांची नियुक्ती पुणे महापालिकेच्या अतिरिक्त पदी करण्यात आलेली होती. सुमारे सव्वा वर्षापूर्वी त्यांनी पुणे महापालिकेतील हा पदभार स्वीकारला होता. त्यांच्याकडे पथ, भवन, भांडार, क्रीडा अशा विभागांचा कार्यभार होता. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असल्याने रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत नागरिकांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे ढाकणे यांनी महत्त्वाच्या ठिकाणचे बॉटल नेक कमी करण्याचा विडा उचललेला होता. पथ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका, प्रत्यक्ष पाहणे, नागरिकांशी चर्चा आणि त्यानंतर थेट कारवाई करणे असा त्यांच्या कामाची पद्धत होती. या माध्यमातून त्यांनी कात्रज कोंढवा रस्त्याचा रखडलेला भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावला, तसेच मुंढवा बायपास येथील कोंडी, केशवनगर येथील कोंडी सिंहगड रस्त्यावर माणिक बागेतील अतिक्रमणाचा वाद, जुन्या मुंबई पुणे महामार्गाचे बोपोडी पर्यंत रुंदीकरण असे विषय त्यांनी मार्गी लावले. त्याच पद्धतीने नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांचा विरोध सहन करून त्यांनीही बीआरटी उकडून काढली. त्यामुळे वाहतुकीसाठी मोठा रस्ता उपलब्ध झाला. मिशन १५ च्या माध्यमातून शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवरील त्यांनी रस्ता दुरुस्ती, सुशोभीकरण ,अतिक्रमण निर्मूलन या धर्तीवर काम सुरू केलेले होते. या प्रकल्पाचे जवळपास ४० टक्के काम पूर्ण झालेले आहेत यासाठी देखील ढाकणे यांनी पथ विभागासह अन्य विभागांशी समन्वय साधून कार्यवाही सुरू केलेली होती.

पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आदर्श शाळा हा उपक्रम हाती घेतला. त्यातून गेल्या वर्षभरात पंधरा शाळांचे काम केले तर आगामी वर्षात आणखीन ती शाळांसाठीचे नियोजन त्यांनी केलेले होते. भवन विभागातर्फे ८० टक्के पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या इमारतींचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला होता. एकाच वेळेस अनेक पातळ्यांवर युद्धगतीने काम करून घेणे हा ढाकणे यांचा मूळ कामाचा स्वभाव होता. त्यामुळे अनेक अमुलाग्र बदल या काळात झाले.

आयुक्त विक्रम कुमार यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली. त्यानंतर मंगळवारी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेळणार यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली. या दोन बदल्या त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे अपेक्षित होत्या. मात्र विकास ढाकणे यांची बदली अपेक्षित होती. राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा नुसार काढलेल्या परिपत्रकात विकास ढाकणे यांची बदली करण्यात आलेली आहे. ढाकणे यांची पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेतील सेवा ही तीन वर्षापेक्षा जास्त होत असल्याने निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नियमानुसार ही त्यांची बदली करण्यात आलेली आहे असे सांगितले जात आहे. मात्र ढाकणे यांची बदली ही अपेक्षित नव्हती त्यामुळे आता पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांचे काम गतीने होणार का असा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे.